पुणे : पुण्यात महर्षी कर्वे शिक्षण संस्था येथे पुणे जिल्हयातील प्रकल्पांचे भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील उपस्थित होते. तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनीसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. यावेळी सुप्रिया सुळे भाषणासाठी आल्या असताना कार्यकर्त्यांनी खोडसाळपणा करत घोषणाबाजी आणि जाणूनबुजून टिपण्णी केली. सुप्रिया सुळेंनी मी गडकरी साहेबांचे मनापासून आभार मानते असे वक्तव्य केले असता कार्यकर्त्यांनी खोडसाळपणा केला. त्यावेळी मी उत्तर देऊ शकते पण देणार नाही म्हणत त्यांनी विषय मिटवला.
कार्यक्रमात सुप्रिया सुळे भाषण करत असताना कार्यकर्त्यांनी जय श्रीराम आणि भाजपच्या घोषणा देण्यात सुरुवात केली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना थांबण्याची विनंती केली. परंतु कोणीही थांबले नाही. अखेर सुप्रिया सुळे यांनी तुमचं झालं असेल तर मी भाषण करते. असं म्हणताच दुसऱ्या बाजूने सुळे यांच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी सुरु झाली. थांबा थांबा आपण पक्षसाठी नाही आलो तर गडकरी साहेबांचे आभार मानण्यासाठी येथे आलो आहोत. मी गडकरी साहेबांचे मनापासून आभार मानते. असे सुप्रिया या म्हणताच कार्यकर्त्यांनी खोडसाळपणा केला. त्यावेळी मी उत्तर देऊ शकते पण देणार नाही म्हणत विषय मिटवला
सुळे म्हणाल्या, जनतेच्या आशीर्वादामुळे मला संसदेत काम करण्याची संधी मिळाली. गडकरी साहेबांकडे कधीही काम घेऊन गेलं तर ते कधीही पक्ष बघत नाहीत. ते काम बघतात. त्यामुळे मी बारामती मतदार संघाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानते. गडकरी साहेबांच्या कामाबरोबरच कामाच दर्जाही चांगला असतो. त्यांनी केलेल्या रस्त्याच्या कामाला पुन्हा कधीही खड्डे अजिबात दिसत नाहीत. त्यांनी केलेली कामे दुरदृष्टीने झाली आहेत.
राजकारण बाजूला ठेवून तोडगा काढू
पुण्यातून हिंजवडीला जात असताना प्रचंड ट्राफिक होत असते. तासनतास लोक ट्रॅफिकमध्ये अडकलेले असतात. प्रशासनाकडे अनेक वेळा फॉलो अप केला आहे. पुण्याचे ट्राफिक याकडे आपण सगळ्यांनी लक्ष द्यायला हवे. ट्राफिकवर सगळ्यांनी राजकारण बाजूला ठेवून तोडगा काढायला हवा असं सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितलं आहे.