कार्यकर्ते आणि नेते जोमात , प्रचाराची लगबग सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 08:39 PM2019-03-18T20:39:29+5:302019-03-18T20:43:54+5:30
निवडणूकीचे प्रचार साहित्य तयार करण्यासाठी लागणा-या कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आहेत.
पुणे : लोकसभा निवडणूकांचे बिगुल वाजल्याने राजकीय पक्ष व कार्यकर्ते निवडणुकीच्या तयारीला लागले असून गेल्या काही दिवसांपासून निवडणूक साहित्य खरेदीसाठी संबंधित दुकानदारांकडे विचारणा करण्यास सुरूवात झाली आहे. मात्र,निवडणूक साहित्याच्या किमतीत 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे उमेदवारांचा आणि पक्षाचा निवडणूक प्रचाराचा खर्च काही प्रमाणात वाढणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने 10 मार्च रोजी लोकसभा निवडणूकीची आचार संहिता जाहीर केली. त्यानंतर काही राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली. पुणे लोकसभा मतदार संघातील उमेदवारांची नावे जाहीर झाली नसली तरी काही पक्षांनी शिरूर, मावळ व बारामती या तीन मतदारसंघातील उमेदवारांची यादी प्रसिध्द केली आहे. त्यामुळे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. निवडणूक साहित्याची विक्री करणा-या दुकानदारांनीही प्रचारासाठी नवीन पध्दतीचे उपरणे, झेंडे,फेटे आणि टोप्या,बिल्ले आदी साहित्य उपलब्ध करून दिले आहे.
निवडणूकीचे प्रचार साहित्य तयार करण्यासाठी लागणा-या कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आहेत.त्यामुळे निवडणूक साहित्याच्या किमतीतही वाढ झाली आहे. तसेच या सहित्यासाठी जीएसटीचे वेगळे पैसे आकारले जाणार आहेत. सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडून इतर सर्वच पक्षांकडून हजारो झेंड्यांची,टोप्यांची,उपरण्याची मागणी केली जात आहे. त्यातही यंदा निवडणूक काळात उन्हाचा तडाखा जाणवणार असल्याने प्रामुख्याने ग्रामीण भागातील उमेदवारांकडून कापटी आणि कागदी टोप्यांना अधिक मागणी आहे.
सर्व सामान्य कार्यकर्ता आणि सेलिब्रिटी प्रचारक,पक्षाचा वरिष्ठ नेता यांना एकसारखे उपरणे,पगडी देवून चालत नाही.त्यामुळे विशेष व्यक्तींसाठी वेगळ्या डिझाईनच्या आक र्षक वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.तसेच विविध पक्षांचे बॅच मेटल व डायमंडमध्ये बाजारात उपलब्ध आहेत.त्याचप्रमाणे राजकीय पक्षांचे झेंडे सुध्दा मेगा झेंडा,जंबो झेंडा आणि मध्यम आकाराचा झेंडा अशा स्वरुपात मिळत आहेत. गाडीवर लावण्यासाठीचे राजकीय नेत्यांचे तयार कटआऊट सुध्दा विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.
सध्या सर्व पक्षांच्या उमेदवारांची नावे अद्याप जाहीर झालेली नाही. परंतु, लोकसभेचे तिकीट मिळण्याची शक्यता असणा-या संभाव्य उमेदवाराकडून निवडणूक साहित्य खरेदीबाबत नोंदणी केली जात आहे. मात्र, सर्वच राजकीय पक्षांकडे निवडणूकीचा प्रचार करणा-या पूर्णवेळ कार्यकर्त्यांचा तुटवडा आहे. त्यामुळे काही उमेदवार प्रचारासाठी कार्यकर्ते जमा करण्यापासून सोशल मिडियावर प्रचार करण्यापर्यंतची सर्वच कामे करण्यासाठी खासगी संस्था (एजन्सी) नेमली जात आहे.परिणामी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडूनही निवडणूकीचे साहित्य खरेदी केले जात आहे.
.............
सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवारांची नावे जाहीर झाली नसली तरी संभाव्य उमेदवारांकडून निवडणूक साहित्य खरेदीची ऑर्डर दिली जात आहे. झेंडे, उपरणे, मुकुट, टोप्या आदी साहित्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे या साहित्यांच्या किमतीत १५ ते २० टक्के वाढ झाली आहे.
- गिरीश मुरूडकर.
................
निवडणूक साहित्याचे विक्रेते मतदार संघात प्रत्यक्ष फिरून प्रचार करण्याबरोबरच सध्या सोशल मिडियावरील प्रचाराला अधिक पसंती दिली जात आहे. मात्र, साधे छायाचित्र काढून व्हाटस् अॅप, फेसबुक, व्टिटरवर टाकल्यावर प्रसिध्दी मिळत नाही. तर आकर्षक फेटा,पगडी,उपरणे आणि बिल्ला लावलेले छायाचित्र अपलोड केल्यावर अधिक प्रसिध्दी मिळते. त्यामुळे उमेदवारांकडून आर्कषक उपरणे, फेटे, पगडी यांची मागणी केली जात आहे,असेही निवडणूक साहित्य विक्रेत्यांनी सांगितले.