पुणे: पत्रांच्या माध्यमातून नेत्यांमधील गटबाजी चव्हाट्यावर येऊ लागल्याने शहर काँग्रेसचे नवे-जुने कार्यकर्ते त्रस्त झाले आहेत. पक्षाच्या आतील गोष्टी जाहीरपणे उमटत आहेत. ज्येष्ठ नेते मात्र ‘वाद मिटवा’चा सल्ला देत आहेत.
दरम्यान, पोलिस आयुक्तांना एकाच विषयावर दोन वेगवेगळ्या मागण्यांची पत्र नेत्यांनी दिली. त्यातून ही गटबाजी उघड झाली. शहराध्यक्ष अरविंद शिंदे व त्यांचे समर्थक तसेच प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, रमेश बागवे व त्यांचे समर्थक अशी उघड गटबाजी काँग्रेसच्या शहर शाखेत सुरू झाली आहे.
शिंदे यांनी घेतलेल्या कार्यक्रमांना जोशी बागवे गटाचे कार्यकर्ते उपस्थित नसतात, तर जोशी-बागवे गटाने घेतलेल्या कार्यक्रमांना शिंदे गटाचे कार्यकर्ते हजर राहत नाहीत. महागाई विरोधातील आंदोलन असो की एखाद्या विशिष्ट दिवसाचा कार्यक्रम, दोन्ही गटांकडून सध्या असे कार्यक्रम जाहीरपणे होत असून त्यामधून ही गटबाजी उघड होत आहे.
फ्लेक्सबाजीतूनही नेत्यांमधील हे परस्परांवर कुरघोडी करण्याचे प्रकार जाहीर होत आहेत. पक्षाच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाला लागणाऱ्या फ्लेक्समधून हे उघड झाले. दोन्ही गटाचे फ्लेक्स काँग्रेस भवनच्या आवारात लागले, मात्र त्यावर दुसऱ्या गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची छायाचित्रेच लावली गेली नाहीत. तेव्हापासून ही तेढ वाढतच गेली असून त्याचे पर्यवसान अखेर पोलिस आयुक्तांना दिलेल्या पत्रात झाले. आधी जोशी गटाने कोरोना काळातील सामाजिक तसेच राजकीय गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी केली, तर शिंदे गटाने लगेचच पक्षातील दुसऱ्या गटाने केलेली मागणी म्हणजे पक्षाची अधिकृत भूमिका समजू नये, असे पोलिस आयुक्तांनाच कळवले. संघटित गुन्हेगारी कृत्याला राजकीय समजू नये, अशी मागणी त्यांनी केली.
पक्षाच्या दुसऱ्या तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. कोणत्याही गटात नसणारे काही कार्यकर्ते असतात ते तर यामुळे वैतागले आहेत. कोणाच्या कार्यक्रमाला कोण आहे, याची पाहणीच दोन्ही गटांकडून केली जाते. त्यानंतर कधी भेट झालीच तर त्याविषयी लगेच जाणीव करून दिली जाते. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी कुठेच जाणे नको, अशी भूमिका घेत सध्या पक्षापासून बाजूला राहणेच पसंत केल्याचे दिसते आहे.
''वाद संपवा अन् पक्षाला मजबूत करण्याचा प्रयत्न करा, त्याचीच आज गरज आहे. पक्षाचे अंतर्गत व्यासपीठ आहे, त्यावर व्यक्त व्हा; पण जाहीरपणे पक्ष कमकुवत करणाऱ्या गोष्टी टाळा. आज पक्षाला मतभेद मिटवून काम करत पक्षाची वाढ करणाऱ्यांची गरज आहे. - उल्हास पवार, ज्येष्ठ नेते, माजी आमदार''