लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ग्रंथालयीन चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, पुणे मराठी ग्रंथालयाचे माजी कार्यवाह, विदयमान कार्यकारी मंडळाचे सदस्य आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक हेमंत दामोदर ऊर्फ बाळासाहेब कुलकर्णी (वय ७४) यांचे करोनामुळे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे.
मूळचे चिकुर्डी (जि. सांगली) गावचे असलेले हेमंत कुलकर्णी यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा पूर्ण केला. कराड, कोल्हापूर आणि पुणे अशा जीवन प्रवासात सातत्याने संघ समर्पितच राहिले. आणीबाणीमध्ये पहिल्या सत्याग्रहाचे ते खंदे कार्यकर्ते होते. याबरोबरच मिसारवाली विसापूर तुरुंगात त्यांनी तुरुंगवास भोगला. मोतीबागनगर आणि कसबा भागाचेही ते संघचालक होते.
पुणे मराठी ग्रंथालयाच्या नूतन वास्तू उभारणीमध्ये कुलकर्णी यांनी मोलाचे योगदान दिले. ग्रंथालयाचे सहकारनगर येथील केंद्र आणि योगी अरविंद मंचतर्फे अभ्यासिका सुरू करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. ग्रंथालय भारती या संस्थेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे आमंत्रक म्हणून त्यांनी काम पाहिले होते.