पुणे :विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणावर पक्षांतर होत असताना खासदार अमोल कोल्हे यांनी वेगळा राग आळवला आहे. जे लोक पक्ष सोडून गेले त्यांच्यामुळे कार्यकर्ते अधिक इर्षेने लढतील असे मत त्यांनी पुण्यात व्यक्त केले. राज्यभरातील युवक कार्यकर्त्यांसाठी राष्ट्रवादीने पुण्यात युवक संवाद शिबीर आयोजित केले होते. या शिबीरासाठी कोल्हे यांच्यासह पार्थ पवार, अंकुश काकडे, रुपाली चाकणकर, सक्षणा सलगर, चेतन तुपे, प्रशांत जगताप आदी उपस्थित होते.
कोल्हे यांनी यावेळी थेट भाषण करण्याऐवजी कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.त्यावेळी कार्यकर्त्यांच्या मनातले नैराश्य कमी करण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. ते म्हणाले की,२० ते ३० वर्षांनंतर स्थित्यंतराची वेळ येते. ती आता आली आहे.हा परिवर्तनाचा टप्पा आहे. मात्र त्यातून तरुण नेते पुढे येतील. जे पक्षातून बाहेर गेले त्यांच्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अधिक इर्षेने लढतील. शिवाय कार्यकर्त्यांना त्यांनी सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष प्रचारासाठीही काही सूचना दिल्या. राष्ट्रवादीचा जाहीरनामा पोचवण्यासाठीच्याही खास टिप्स दिल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे मांडलेल्या प्रश्नांवरही काम करण्याचे आश्वासन दिले.