इंदापूर : कोरोनाच्या पहिल्या दिवसापासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोरोना नियमांबाबत जागरूक असल्याचे पाहायला मिळाले आहे. स्वतःसह आपल्या कार्यकर्त्यांना देखील ते कोरोना नियमाचे पालन करण्याविषयी आग्रही भूमिकेत असतात. याचवरुन बेशिस्त कार्यकर्त्यांचे वेळोवेळी ते कान टोचतानाही दिसत असतात. आता राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील कोरोना नियमांचं पालन न करणाऱ्या कार्यकर्त्यांना गर्भित इशारा दिला आहे. त्यांनी ज्या सदस्यांचे तीन वेळा विनामास्क फोटो पुढे येतील त्यांना तिकीटच देऊ नका, असा आदेशच सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना दिला आहे.
खासदार सुप्रिया सुळे गुरुवारी (दि. १७) इंदापूर दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी एका कार्यक्रमात बोलत होत्या. सुळे म्हणाल्या, कोरोनामुळे अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहे. यात बऱ्याच कुटुंबांनी तर आपला कर्ता माणूस गमावला आहे. त्याचबरोबर दुसरीकडे आई किंवा वडील तर काही कुटुंबात दोघांनाही कोरोनाने हिरवल्यामुळे अनेक मुलं अनाथ झाली आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत या मुलांना आधाराची खूप आवश्यकता आहे. अनाथ झालेलं एकही मुल मायेच्या आधारापासून वंचित राहू नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या यंत्रणांनी परस्पर सामंजस्य व गांभीर्याने काम करण्याची आवश्यकता आहे.
कोरोना नियमांचं पालन करण्यावरून अजितदादांचं कौतुक अजितदादांचा मास्क दीड वर्षात खाली आला नाही. कुठल्या कारणासाठी मास्क काढावा लागला तर ते काही सेकंदात पुन्हा घालतात, अशा शब्दात त्यांच्यावर कौतुक केले आहे. अशावेळी माझी जिल्हाध्यक्षांना विनंती आहे की, ज्या सदस्यांचे तीन वेळा विनामास्क फोटो पुढे येतील त्यांना तिकीटच देऊ नका, असा आदेशच सुप्रिया सुळे यांनी दिलाय. त्याचबरोबर मागील दीड वर्ष आणि पुढील एक वर्ष पंतप्रधान मोदी यांनी आमचा खासदार निधी कापल्याचंही त्यांनी सांगितलं.