पुणे : ‘‘कुसुमाग्रजांचे धरून बोट, एकेक पाठ गिरवू लाग...ऐक छकुल्या, तुझ्या घरी ने अक्षरबाग...अक्षरबाग !’’लहान मुलांमध्ये मराठी भाषेची गोडी निर्माण व्हावी, यासाठी आकर्षक बागेची निर्मिती करण्यात आली आहे. या बागेत मुलांना मराठी भाषेतील वर्णमाला व मुळाक्षारे पाहता येतील. उद्या (दि. २७) साजºया होणाºया मराठी राजभाषा दिनानिमित्त पालकांनी त्यांच्या मुलांना घेऊन अरण्येश्वर येथील बागेस भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.प्रभाग क्रमांक ३५ मधील महापालिकेच्या कै. शंकरराव कावरे उद्यानात नगरसेविका अश्विनी नितीन कदम यांच्या संकल्पनेतून ही अक्षरबाग तयार झाली आहे. लहान मुलांना मराठी भाषा सहज व लवकर अवगत व्हावी यासाठी ही बाग साकारण्यात आली आहे. बागेतील सर्व झाडांवरती, मोकळी हिरवळ व जॉगिंग ट्रॅकच्या चारही बाजूने अक्षरांच्या प्रतिकृती स्वरूपात मांडण्यात आल्या आहेत. बागेतील झुळझुळ वाहणारा धबधबा हा दगड कामातून निर्माण केलेल्या धबधबा अक्षरातून वाहतो व तो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. लहान मुलांना लपाछपी खेळण्यासाठी ‘अ’ या अक्षराची मोठी प्रतिकृती तयार केली आहे. त्याच्या मागील बाजूस सुंदर रंगकाम करून मराठी मुळाक्षरे (स्वर व व्यंजने) लिहिली आहेत. लहान मुलांना प्राण्यांची ओळख व्हावी या हेतूने वाघ, हत्ती, सिंह व अनेक प्रकारच्या प्राण्यांच्या स्वरूपातील प्रतिकृतीतील खुर्च्या तयार करण्यात आल्या आहेत. तसेच मराठी भाषा साहित्यिक कट्ट्याचे नियोजनही करण्यात आले आहे.
अक्षरबागेत गिरवा मराठीचे धडे , लहान मुलांना भाषेची गोडी लागण्यासाठी उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 6:32 AM