लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या अखत्यारीतील सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) या संस्थेने आयोजित केलेल्या बत्तीसाव्या ‘राष्ट्रीय रस्ता सुरक्षा मास’ या कार्यक्रमाचा समारोप नुकताच झाला. ‘सडक सुरक्षा जीवनरक्षा’ हा उपक्रम दहा लाख नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आला.
या काळात ‘व्हर्च्युअल रस्ता सुरक्षा शैक्षणिक गॅलरी’ सुरू करण्यात आली. या गॅलरीच्या माध्यमातून, रस्त्यांवरील शिस्त, वाहनचालकांच्या वर्तनातील बदल यांबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली. रस्त्यांवरील सुरक्षिततेच्या पद्धतींना प्रोत्साहन देण्यात आले.
‘सडक सुरक्षा जीवनरक्षा’ हा संदेश उपक्रमातून देण्यात आला. ट्रक, बस आणि तीन चाकी वाहनांचे चालक, तसेच शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला चालक आणि इतर नागरिकांसाठी सियाममार्फत रस्ता सुरक्षा जागरूकता आणि प्रशिक्षण उपक्रमांची मालिका आयोजित करण्यात आली. पंचवीसपेक्षा जास्त ठिकाणी वाहनचालकांसाठी सुरक्षित ड्रायव्हिंग, आरोग्य आणि नेत्रतपासणी अशी शिबिरे घेण्यात आली. यातून अकरा हजारांपेक्षा जास्त वाहनचालकांना प्रशिक्षण देण्यात आले.