पुणे : पुणेकर अनेक दिवसांपासून वाट पाहत असणारी मेट्रो अखेर मागील महिन्यात सुरु झाली. २०१६ च्या भूमिपूजनांनंतर आता मेट्रो धावू लागली आहे. कित्येक वर्षांनी मेट्रो सुरु झाल्याने पुणेकर अतिशय उत्साहात प्रवास करू लागले आहेत. महामेट्रोकडूनही विविध ऑफर दिल्या जात आहेत. हा उत्साह पाहून अनके कलाकारही पुणे मेट्रोला भेट देत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते महेश कोठारे यांनी पुणे मेट्रोला भेट दिली आहे. त्यांनी मेट्रोचे कौतुक करण्याबरोबर प्रवासही केला आहे.
महेश कोठारे यांनी मेट्रोला भेट दिली. त्यानंतर मेट्रो स्थानकांची पाहणी केली. त्यावेळी महेश कोठारे यांनी मेट्रो प्रशासनाचे कर्मचारी, नागरिक यांची विचारपूसही केली. तेथील काम करणाऱ्या सर्वांचे त्यांनी मनापासून कौतुकही केले. तसेच तिकीट सुविधा, ऑनलाईन तिकीट, महिनाभराचा पास, याबद्दल माहिती जाणून घेतली.
भुयारी मार्ग वर्षअखेरीस सुरु होणार
शिवाजीनगर ते स्वारगेट हा ५ किलोमीटरचा मार्ग पूर्ण भूयारी आहे. मंडईपासून पुढे कसबा पेठेपर्यंतचा एक भाग वगळता येणारा व जाणारा असे दोन्ही बोगदे आता पूर्ण झाले आहेत. बोगदा खोदला जात असतानाच त्याला क्राँक्रिटचे अस्तर तयार होत जाते. या ट्यूबमध्ये आता रूळ टाकण्याचे तसेच वि्द्यूत तारा, दिवे बसवण्याचे काम सुरू आहे. या ५ किलोमीटरच्या भूयारी मार्गात ५ स्थानके आहेत. त्यापैकी शिवाजीनगर स्थानकाचे काम गतीने होत आहे.स्थानकात दोन्ही बोगदे एकत्र होतात व स्थानकाचे अंतर संपले की पुन्हा स्वतंत्र होतात. सिव्हिल कोर्ट, कसबा पेठ, मंडई व स्वारगेट या स्थानकांची कामे सुरू आहेत. भूयारी मार्गाचे कामही पूर्ण करून त्यातून वर्षअखेरीस मेट्रो सुरू करण्याचा महामेट्रोचा प्रयत्न आहे.
पुणे मेट्रोचे खास ऑफर
पुणे मेट्रो ट्रॅव्हल कार्ड पीसीएमसी, संत तुकाराम नगर, भोसरी, कासारवाडी, फुगेवाडी, वनाज, आनंदनगर, आयडियल कॉलनी, नळ स्टॉप, आणि गरवारे कॉलेज मेट्रो स्थानक, येथे सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत तिकीट खिडकीवर उपलब्ध होणार आहे. कार्डसाठी (आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायविंग लायसन्स, पासपोर्ट, मतदान कार्ड, शाळेचे ओळखपत्र) यापैकी ओळख पुराव्यांसह फोटो सादर करावे लागणार आहेत. कार्डची किंमत ५०० रुपये असून ते ३० एप्रिलपर्यंत अमर्यादित प्रवासासाठी वापरले जाता येणार आहे. अशी माहिती महामेट्रोने दिली आहे.