पुणे - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि अभिनेता सुबोध भावे एकमेकांचे बायोपिक करणार आहेत. तसं त्यांचं ठरलं देखील आहे. पुण्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी संवाद कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारा अभिनेता सुबोध भावे आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात हा गमतीशीर किस्सा घडलाय.
एक अभिनेता म्हणून मी अनेकांचे बायोपिक केले आहे. लोकमान्य टिळकांच्या जीवनावरही बायोपिक केला आहे. मला अनेक लोकांनी सांगितले की, मी राहुल गांधी यांच्यासारखा दिसतो. मग मी विचार केला की, राहुल गांधी यांचा बायोपिक मी का करु नये? असं अभिनेता सुबोध यांनी राहुल गांधी यांना सांगताच राहुल गांधीनीही सुबोध, तू जसा माझ्यासारखा दिसतोस, तसाच मी पण तर तुझ्यासारखा दिसतो असं कौतुक अभिनेता सुबोध भावेचे केले. यानंतर सुबोध भावे याने सांगितलं की आपण एकमेकांवर बायोपिक करुया असं सांगितल्यावर उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये हशा पिकला.
बायोपिकच्या माध्यमातून एका व्यक्तीच्या जीवनातील संघर्ष दाखवला जातो. मात्र ज्याच्या आयुष्यात लहानपणी दोन अशा घटना घडल्या ज्यामध्ये त्याच्या वडीलांचा मृत्यू आणि आजीचा मृत्यू पाहावा लागला. हे इतक्या लहान वयात असताना तुम्ही या घटना पाहिल्या आहेत हे सहन करण्याचं बळ तुमच्यात कसं आलं असा प्रश्न सुबोध भावे यांनी राहुल गांधी यांनी विचारला होता.
त्यावेळी राहुल गांधी यांनी उत्तर दिले की, अनुभवातून माणूस शिकत असतो. ज्या संकटाचा सामना करावा लागला त्याला सामोरे गेलो. सत्यापासून विनयशीलता येते आणि विनयशीलतेमधूनबळ मिळतं. सत्य कडू असलं तरी ते स्विकारावं लागतं. खोटं स्विकारलं तर भिती वाटते. कडू जरी असलं तरी ते सत्य मी स्विकारतो आणि त्यातून काम करतो.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुण्यातील लक्ष्मी लॉन्स मगरपट्टा येथील कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेता सुबोध भावे आणि आरजे मलिष्का यांनी केली. यावेळी राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.
पाहा व्हिडीओ -