पुणे : प्रसिद्ध एकपात्री कलाकार, व्यक्तिमत्त्व विकास तज्ज्ञ, कॉर्पोरेट ट्रेनर वंदन नगरकर (वय ६१) यांचे मंगळवारी खासगी रुग्णालयात निधन झाले. विनोदी अभिनेते, नाटककार, लेखक राम नगरकर यांचे ते चिरंजीव होत. त्यांच्या पश्चात पत्नी डॉ. वैजयंती आणि मुलगी विनिषा आहेत.
गेल्या वर्षभरापासून फुप्फुसाच्या संसर्गाने ते त्रस्त होते. चेन्नई येथील रुग्णालयात त्यांच्यावर फुप्फुस प्रत्यारोपणाची शस्त्रक्रियाही झाली. उपचार घेऊन ते पुण्यात आले होते. पुन्हा त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येत्या २४ मार्च रोजी ते ६२ व्या वर्षांत पदार्पण करणार होते. मात्र त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने कला क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यावर रात्री उशिरा वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड येथे त्यांचे शालेय शिक्षण तर अभिनव कला महाविद्यालयाचे ते विद्यार्थी होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते व्यक्तिमत्त्व विकास आणि कॉर्पोरेट ट्रेनर या क्षेत्रात पूर्णवेळ कार्यरत होते. वडील राम नगरकर यांच्या निधनानंतर वंदन यांच्यातील कलागुण ओळखून दिवंगत अभिनेते निळू फुले यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे वंदन यांनी ‘रामनगरी’ ला पुन्हा रंगभूमीवर सादर करण्याचे ठरवले आणि त्याचे अनेक प्रयोगही केले. एकपात्री कलाकार परिषद आणि आम्ही एकपात्री या संस्थांचे त्यांनी नेतृत्व केलेले होते. या माध्यमातून अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, एकपात्री महोत्सव राज्यात अनेक ठिकाणी त्यांनी आयोजित केले होते. तीन-चार प्रसिद्ध एकपात्री कलावंतांचा ‘हास्यजल्लोष’ हा कार्यक्रम ते करत. त्यांच्या माध्यमातून अनेक नवीन एकपात्री कलाकार तयार झाले आहेत.
कॉर्पोरेट क्षेत्रात राष्ट्रीय प्रशिक्षक असून त्यांनी विद्यार्थ्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सुमारे दोन हजार कार्यशाळा घेतल्या आहेत, व्यक्तिमत्त्व विकास अथवा ‘सॉफ्ट स्किल्स’ या विषयात त्यांनी अनेकांना प्रशिक्षण दिले आहे. ‘भाषणाचे प्रभावी तंत्र’, ‘भरारी यशाची’, ‘टर्निंग पॉईंट’, ‘पालकांचे चुकते कुठे?’, ‘प्रभावी इंटर टेक्निक्स’ आणि इंग्रजीतील ‘स्पिक विव कॉन्फिडन्स’ अशा सहा पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. अनेक प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये त्यांचे व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर लेख प्रसिद्ध झाले आहेत. ते राम नगरकर कला अकादमी, पुणे या संस्थेचे अध्यक्ष होते.