पुणे : नुकताच प्रदर्शित झालेल्या काॅलेज डायरी हा सिनेमा जितक्या थिएटरमध्ये प्रदर्शित हाेणे अपेक्षित हाेता तितक्या थिएटरमध्ये प्रदर्शित न झाल्याने कलाकारांनी वितरांना चांगलाच चाेप दिला. पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर ही घटना घडली. चित्रपटाला थिअटर्स न मिळाल्यामुळे आर्थिक नुकसान झाल्याचे चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माता असलेल्या अनिकेत घाडगे यांचे म्हणणे आहे. दरम्यान याविराेधात दाेन्ही पक्षांकडून अद्याप पाेलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
काॅलेज डायरी हा सिनेमा गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झाला. हा सिनेमा राज्यातील 100 थिएटरमध्ये दाखविण्याचे आश्वासन वितरक असलेल्या याेगेश गाेसावी आणि सचिन पारेकर यांनी निर्मात्यांना दिले हाेते. तसेच त्याबाबतचे पैसे देखील घेतले हाेते. प्रत्यक्षात हा सिनेमा केवळ 45 थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आल्याचा आराेप घाडगे यांनी केला आहे. तसेच चित्रपटाला याेग्य वेळा न दिल्याने चित्रपट लाेकांपर्यंत न पाेहचल्याचे देखील घाडगे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आज या रागातून सिनेमातील कलाकार अविनाश खेडेकर आणि विशाल सांगळे यांनी वितरकांना चांगलाच चाेप दिला.
घाडगे म्हणाले, कर्ज काढून मी हा सिनेमा तयार केला आहे. हा सिनेमा राज्यातील शंभर थियटरमध्ये दाखविण्याचे आश्वासन वितरक याेगेश गाेसावी आणि सचिन पारेकर यांनी दिले हाेते. बुधवारी रात्री केवळ 30 थिअटरमध्ये हा सिनेमा प्रदर्शित हाेईल असे आम्हाला सांगण्यात आले. सिनेमाचे प्रमाेशन साेडून मी दुसऱ्या दिवशी मुंबईत आणखी थिएटर मिळण्यासाठी वेळ घालवला. त्यानंतर आणखी 15 थिएटर वाढली. परंतु आम्हाला सांगण्यात आलेल्या थिएटरच्या संख्येपेक्षा ही संख्या निम्मी देखील नव्हती. सिनेमा या शुक्रवारी प्रदर्शित झाला परंतु त्याला याेग्य वेळा देण्यात आल्या नाहीत. आम्ही अनेक दिवसांपासून वितरकांना संपर्क करत हाेताे, परंतु ते आम्हाला प्रतिसाद देत नव्हते. त्यामुळे आज रागाच्या भरात कलाकारांनी त्यांना चाेप दिला.