पुणे : ‘कुली’ या चित्रपटादरम्यान अमिताभ बच्चन यांचा जीवघेणा अपघात झाला होता. त्यावेळी जया बच्चन यांनी गणपतीचे दर्शन घेऊन नवस बोलला होता. अमिताभ बच्चन बरे झाल्यानंतर जया बच्चन यांनी गणपतीचे दर्शन घेऊन सोन्याचे कान अर्पण केले होते.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हा पुण्यातच नव्हे तर देश-विदेशातही अत्यंत लोकप्रिय आहे. लता मंगेशकर यांचे वयाच्या ८व्या वर्षी पहिले गाणे दगडूशेठ हलवाई मंडपात झाले होते. फक्रुद्दीन अली अहमद हे १९७५ मध्ये राष्ट्रपती असताना त्यांच्या हस्ते गणेशोत्सवात आरती झाली होती.
१८९३ साली स्थापना झालेला हा गणपती पूर्वी 'कोतवाल चावडीचा गणपती' तसेच 'बाहुलीच्या हौदाचा गणपती' म्हणून ओळखला जात होता. पुढे संस्थापक 'श्रीमंत दगडूशेठ हलवाई' यांच्या नावाने हा गणपती प्रसिद्ध झाला. त्यामागेदेखील रोचक अशी कहाणी आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई इंग्रजकाळात मोठे प्रस्थ होते. त्यांना इंग्रजांनी 'नगरशेठ' पदवी बहाल केली होती. त्यांचा मिठाईचा व्यवसाय होता. पुण्यात थैमान घातलेल्या प्लेगच्या साथीत त्यांचा एकुलता एक मुलगा मरण पावला. पुत्रवियोगाने शोकाकुल झालेल्या दाम्पत्याला त्यांचे आध्यात्मिक गुरू श्री माधवनाथ महाराज यांनी सांत्वन करून धीर देत सांगितले की, तुम्ही दत्ताची व गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून त्यांची पूजाअर्चा करा. त्या मूर्तींना पोटच्या मुलांप्रमाणे सांभाळा. हीच दैवते तुमचे नाव एक दिवस जगप्रसिद्ध करतील, असे महाराजांनी दगडूशेठ हलवाई व लक्ष्मीबाई हलवाई यांना सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी दत्ताची संगमरवरी व मातीची गणपतीची मूर्ती बनविली. आज खऱ्या अर्थाने श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त व श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ही दोन मंदिरे त्यांच्या संस्थापकांच्या नावानिशी जगभरात ओळखली जातात.
सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत असला तरी या गणपतीचे कायमस्वरूपीचे गाणपत्य शैलीतील मंदिर आज बुधवार पेठेत फरासखान्याजवळ आहे. वर्षभर गणेश जयंती, गुढीपाडवा तसेच आंबा-शहाळे-मोगरा अशा विविध उत्सवांचे आयोजन केले जाते. 'श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती सार्वजनिक ट्रस्ट' धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे.
मंडळाच्या स्थापनेची ही तिसरी मूर्ती
आज आपण जी चतुर्भुज अर्धपद्मसनातील गणेशमूर्ती बघतो ती मंडळ स्थापनेपासूनची १९६७ सालची तिसरी मूर्ती आहे. शंकर आप्पा शिल्पी व त्यांचा मुलगा नागेश शिल्पी यांनी ही मूर्ती घडवली आहे. ते मूळचे कर्नाटकातील धारवाडचे. त्यावेळेस त्यांना २४,००० रुपये मानधन दिले होते. मूर्ती बनविण्यासाठी त्यांचे नाव बाळासाहेब परांजपे यांनी सुचविले होते. मूर्ती बनविताना योगायोगाने ३६५ वर्षांनी सूर्यग्रहण आले होते. तर या मुहूर्तावर मूर्तीत यंत्र बसविले तर मूर्तीचे तेज उत्तरोत्तर वाढेल आणि मूर्तीस देवत्व प्राप्त होईल, म्हणून या मूर्तीच्या पोटात सिद्ध केलेले यंत्र बसविण्यात आले आहे. त्याकाळी मूर्ती बनविण्याचा खर्च ११२५ रुपये इतका आला होता.