पुणे : भूमिका ही कलाकारांच्या नशिबात असते. मात्र मिळालेल्या भूमिकेचं सोनं करणं त्याच्या कर्तृत्वावर अवलंबून असते. अशीच एक आठवण नटसम्राट नाटकाच्या डीव्हीडीमध्ये कावेरी'ची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष यांनी जागवली आहे.
डॉ श्रीराम लागू यांचे मंगळवारी पुण्यात निधन झाले. त्यांचे अनेक सुहृद, सहकलाकार, मित्र यांनी आपल्या भावना लोकमत'कडे व्यक्त केल्या. यावेळी ज्योती सुभाष यांनी लागू यांच्या आपल्या अभिनयाने अजरामर केलेल्या 'नटसम्राट' नाटकाची आठवण जागवली.
यावेळी ज्योतीताई म्हणाल्या की, मूळ नाटकात अभिनेत्री शांता जोग यांनी आप्पासाहेब बेलवलकर यांच्या पत्नीची कावेरीची भूमिका साकारली होती. मात्र नाटक पुनर्जीवित करताना डॉ लागू यांनी मला ही भूमिका करण्याविषयी विचारले आणि अर्थात मी हो म्हणाले. दुर्दैवाने ते काम पुढे गेले नाही. पुढे जाऊन नटसम्राटची डीव्हीडी करण्याची वेळ आली तेव्हा मात्र त्यांनी 'ज्योतीला सांगितले होते आणि कावेरीची भूमिका ती करेल' असे सांगितले.त्यामुळे डीव्हीडीमध्ये मी काम केले आहे. अनेकजण आजही मला भेटून त्याबद्दल सांगतात.
'लागू हे माणूस म्हणून, मित्र म्ह्णून पाठीशी होते. ते असले की आम्हाला शांत आणि आश्वस्त वाटायचं, ती आश्वस्तता आज हरवून गेल्याची भावना आहे' अशा भावना त्यांनी बोलून दाखवल्या.