पुणे : पंडित नेहरूंची बदनामी करणाऱ्या अभिनेत्री पायल रोहतगी हिच्यावर कारवाई होईलच, पण तिच्या मागचा बोलविता धनी वेगळा आहे, त्याचा शोध पोलिसांनी घ्यावा अशी मागणी पुणे शहर काँगेसने केली. शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, शहर सरचिटणीस रमेश अय्यर, फिर्यादी संगिता तिवारी, इंटकचे कैलास कदम, दत्ता बहिरट यावेळी उपस्थित होते.
पंडित नेहरू आधुनिक भारताचे भाग्यविधाते आहेत, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले आहे. एखादी अभिनेत्री त्यांंची बदनामी करते त्यावेळी ती एकटी नसते. तिच्यामागे कोणतरी भक्कमपणे उभं असते, त्यांचा शोध घ्यावा अशी मागणी असल्याचे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितल.
बागवे म्हणाले, या विचारधारेच्या प्रयत्नांमधून नेत्यांचीच नाही तर देशाचीही बदनामी होत आहे. यातून काँग्रेस कार्यकर्त्यांचा संयम सुटला तर त्याला जबाबदार कोण? जोशी यांनी रोहतगीच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्ते ठिकठिकाणी फिर्यादी दाखल करतील असं सांगितलं.
रोहतगी हिने चित्रफित तयार करून ती समाजमाध्यमांवर पोस्ट केली. हा विकृत प्रकार आहे. काँग्रेसच्या विचारांना, काँग्रेसच्या नेत्यांना भारतीय जनतेच्या मनात अढळ स्थान आहे. त्याला धक्का लावता येत नसल्याने संतापलेल्या कोणीतरी अशी विकृत माणसं उभी केली. पोलिस त्यांचा समाचार घेतीलच,पण खरे गुन्हेगार त्यांच्या मागे थांबलेले लोक आहेत. पोलिसांनी त्यांना पकडावे व त्यांच्यावर कडक कारवाई करावी. म्हणजे याप्रकारचे गुन्हे करण्यास कोणी धजावणार नाही असं मत या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
पायल रोहतगी हिने यापूर्वी अनेकदा काँग्रेस व नेहरु घराण्यावर केली टिका
राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी व त्यांचे कुटंबिय, काँग्रेस परीवार यांच्याविषयी खोटा बदनामीकारक व्हिडिओ तयार करुन तो सोशल मिडियावर पायल रोहतगी हिने प्रसारित केला. बॉलीवूड अभिनेत्री पायल रोहतगी हिने यापूर्वी अनेकदा काँग्रेस व नेहरु घराण्यावर टिका केली होती. त्याबद्दल तिला यापूर्वी अटकही करण्यात आली होती. वादग्रस्त पोस्ट टाकायची नंतर अंगाशी आले की माफी मागायची अशी तिची आजवर सोशल मिडियावरील वाटचाल राहिली आहे. तिने सती प्रथेचे समर्थन करुन वाद ओढवून घेतला होता.