पुणे : मृत्युपत्राद्वारे आत्याला मिळालेल्या जमिनीचा मालकी हक्क मिळण्याबाबत अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने दाखल केलेला दावा लोकअदालतीमध्ये शनिवारी (दि. २५) तडजोडीने निकाली काढण्यात आला. त्यामुळे जमिनीची मालकी प्राजक्ता यांच्याकडे कायम राहिली.
प्राजक्ता यांच्या आजोबांनी आत्याला मृत्युपत्राद्वारे दिलेल्या जमिनीबाबत प्रोबेट (मृत्युपत्र खरे असल्यासंदर्भातला दावा) झालेले होते. प्रोबेट संदर्भातला आदेश या प्रकरणातील दोन्ही बाजूंनी मान्य केला होता. संबंधित जमीन प्राजक्ता यांनी आत्याकडून खरेदी केली आहे. या सर्व बाबी विचारात घेत तडजोड झाल्याने जमीन प्राजक्ता यांची झाली.
या प्रकरणी प्राजक्ता यांनी ॲड. अश्विनी ललित खंडाळे यांच्यामार्फत लोकअदालतीत दावा दाखल केला होता. प्राजक्ता यांचे आजोबा नारायण माळी यांनी धनकवडी येथील एका जागेबाबत १२ नोव्हेंबर २००३ रोजी मृत्युपत्र तयार केले होते. त्यानुसार संबंधित जागा त्यांची मुलगी मंगला फुगे यांना देण्यात आली. संबंधित मृत्युपत्राच्या प्रोबेटसाठी व मिळकतीच्या अंमलबजावणीसाठी फुगे यांनी येथील दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता. प्रोबेटसंदर्भात झालेला आदेश हा या प्रकरणातील वादी व प्रतिवादींनी मान्य केला होता. संबंधित जमीन ही फुगे यांच्याकडून प्राजक्ता हिने खरेदी केली आहे. या मिळकतीबाबत दोन्ही बाजूंना हरकत नव्हती, तसेच भविष्यात राहणार नाही. या प्रकरणातील मिळकतीबाबत कोणताही आक्षेप नसल्याने हे प्रकरण मागे घेऊन मिटवत असल्याचे तडजोडपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते.