पुणे : राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंतीनिमित्त ‘देवकीनंदन गोपाला’ या संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपटामध्ये त्यांच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचा सत्कार मुळशी तालुका परीट (धोबी) समाजाच्या वतीने करण्यात आला.
या मराठी चित्रपटात ‘संत गाडगेबाबा’ यांची भूमिका दिवंगत अभिनेते श्रीराम लागू यांनी साकारली होती. राजदत्त यांनी दिग्दर्शित केलेला खास वऱ्हाडी भाषेतील चित्रपट १९७७ मध्ये प्रदर्शित केला होता. इतक्या वर्षात या चित्रपटाची साधी दखल देखील शासनाकडून घेतली नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंतीच्या औचित्याने मुळशी तालुका परीट (धोबी) समाजाने या चित्रपटातील एका कलाकाराची आवर्जून दखल घेत त्यांना सन्मानित केले. माजी उपमहापौर नाना नाशिककर, नगरसेविका मनीषा कदम, नगरसेवक जयंत भावे, पुणे जिल्हा पुरुष हक्क समिती उपाध्यक्ष संगीता ननावरे, ज्येष्ठ अभिनेत्री रजनी भट, पुणे जिल्हा लॉन्ड्रीधारक संघटनेचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, मुळशी तालुका परीट (धोबी) संघटनेचे कार्याध्यक्ष बंडू साळुंके, महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळाचे पुणे जिल्हा विभागीय सचिव विलास साळुंके उपस्थित होते.
या वेळी कोविड कोरोना योद्धा पुरस्कार तसेच गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.