पुणे : विनयभंगाची तक्रार करून अभिनेत्याकडून खंडणी उकळल्या प्रकरणात अभिनेत्री सारा ऊर्फ गणेश श्रवण सोनवणे (वय 32, रा. सध्या दुबई, मूळ रा. मुंबई) हिचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. आर. वाघमारे यांनी हा आदेश दिला. या प्रकरणात दहशतवाद विरोधी पथकातील पोलिस उपनिरीक्षक अमोल विष्णू टेकाळे (रा. स्वारगेट पोलिस लाइन), राम भरत जगदाळे (रा. पर्वती पायथा, सहकारनगर) आणि रोहिणी मच्छिंद्र माने (रा. नळदुर्ग, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) यांना अटक करण्यात आली होती. अभिनेते सुभाष दत्तात्रेय यादव (रा. गुलमोहर सोसायटी, शास्त्री रोड ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटकपूर्व जामीन अजार्ला फिर्यादीच्या वतीने अॅड. मिलिंद पवार व अॅड. अजय ताकवणे यांनी विरोध केला. हा प्रकार 28 सप्टेंबर 2018 रोजी जगदाळे याच्या सहकारनगर येथील कार्यालयात घडला. यादव व आरोपी हे एकमेकांना ओळखतात. रोहिणी व यादव यांनी ह्यरोल नंबर 18' या चित्रपटात काम केले आहे.
यादव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रोहिणी ही तेव्हापासून आपल्याशी लग्न कर, यासाठी यादव यांच्या मागे लागली होती. वानवडी पोलिस ठाण्यात दाखल असलेला विनयभंगाचा गुन्हा मिटविण्यासाठी जगदाळे याने यादव यांना कार्यालयात बोलावून घेतले. तेथे त्याला व त्याच्या नातेवाइकांना रोहिणी हिचे पाय धरून माफी मागण्यास लावली. त्याचे चित्रीकरण करून 15 लाख रुपयांची मागणी केली. त्यापैकी 1 लाख रुपये टेकाळे यांनी स्वीकारले. त्यानंतर उरलेली रक्कम न दिल्याने जगदाळे, टेकाळे व रोहिणी यांनी संगनमत करून सारा हिच्यामार्फत पाय धरून माफी मागतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करून बदनामी करण्याची धमकी दिली. सारा दुबईत वास्तव्यास असल्याने तिला अटक करता आली नव्हती. भारतात आल्यानंतर तिने येथील जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून अर्ज दाखल केला होता.