कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे दोन वर्षांपासून राज्यातील शाळा महाविद्यालयांसह इतर सर्व शैक्षणिक संस्था बंद आहेत. मात्र,औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या अभ्यासक्रमातील सुमारे ७० टक्के भाग हा प्रात्यक्षिकांवर अवलंबून असतो. तर ३० टक्के भाग सैध्दांतिक (थेअरॉटिकल) प्रशिक्षणाचा असतो. ऑनलाईन पध्दतीने प्रात्यक्षिक (प्रॅक्टिकल) भाग शिकवताना मर्यादा येतात. केवळ विद्यार्थ्यांनाच नाही तर शिक्षकांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. प्रात्यक्षिकांशिवाय विद्यार्थ्यांच्या कौशल्यात वाढ होत नाही. त्यामुळे आयटीआय सुरू करावेत,अशी मागणी केली जात होती.
राज्यातील शासकीय आयटीआयची एकूण संख्या ४१७ असून अशासकीय आयटीआयची संख्या ५५२ आहे. त्यात सुमारे दीड लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आयटीआयचा बहुतांश अभ्यासक्रम प्रात्यक्षिकांवर अवलंबून असल्याने मागील वर्षी सुध्दा विद्यार्थ्यांना आयटीआयमध्ये बोलवून त्यांच्या प्रत्यक्ष परीक्षा घेण्यात आल्या. इयता दहावीचा निकाल जाहीर झाल्यामुळे आयटीआय प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वर्गात बसून शिक्षण घेता येणार आहे.
----------------------------------------