पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात येणारी प्रथम सत्राची परीक्षा शनिवारपासून (दि.१०) सुरू होत आहे. या परीक्षेपूर्वी घेतलेल्या सराव परीक्षेलाही विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सुमारे ६५ टक्के विद्यार्थ्यांनी सराव परीक्षा दिली आहे. सर्व विषयांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर केले आहे.
पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर आणि नाशिक येथील संलग्न महाविद्यालयांतील ५ लाख विद्यार्थी ८० हजार २२४ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. त्यातील ३ लाख ७४ हजार विद्यार्थ्यांनी सराव परीक्षा दिली आहे. विद्यापीठाच्या एसपीपीयू एज्युटेक फाऊंडेशनतर्फे परीक्षा घेतली जात असून, परीक्षा केवळ ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. नियमित बॅकलॉग, एटीकेटी अशा सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा एमसीक्यू पध्दतीने होणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा स्कोअर ४८ तासांत त्यांच्या स्टुडंट प्रोफाइलला दिसणार आहे. विद्यार्थ्यांचा स्कोअर जाहीर झाल्यानंतर ४८ तासांच्या आत विद्यार्थ्यांना काही तक्रार असल्यास स्टुडंट प्रोफाइलला विद्यार्थ्यांना त्यांची तक्रार नोंदवता येणार आहे.
‘एसपीपीयू एज्युटेक फाऊंडेशन’च्या तांत्रिक विभागाचे प्रमुख गजानन अमलापुरे म्हणाले, रोज ८० हजार ते १ लाख ५० हजार विद्यार्थ्यांची परीक्षा होईल या पध्दतीने परीक्षेचे नियोजन केले असून ही परीक्षा सुमारे ४० ते ४५ दिवस चालणार आहे. एक विद्यार्थी किमान ५ ते ६ विषयांची परीक्षा देणार आहे. त्यामुळे तब्बल ३२ लाख परीक्षा विद्यापीठाकडून घेण्यात येणार आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर परीक्षा घेणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे एकमेव विद्यापीठ असेल, असे मानले जात आहे.
--
हेल्पलाईनवर अडचणी सांगता येतील
परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्यास त्यांच्यासाठी ०२०-७१५३०२०२ हा हेल्पलाईन क्रमांक दिला आहे. याशिवाय विद्यापीठाच्या एक्झाम सेक्शनमध्येच एक चॅट बॉक्स ही विद्यार्थ्यांना दिसेल. त्यावर ते त्यांच्या अडचणी सांगू शकतात. अद्याप युजरनेम आणि पासवर्ड मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांनी आपापल्या महाविद्यालयांशी संपर्क साधावा व युजरनेम व पासवर्ड मिळवावा.
--
सराव परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यात आल्या आहेत. त्यानंतरही काही अडचणी आल्यास त्या सोडवण्यासाठी विद्यापीठाकडून प्रयत्न केले जात आहेत. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे.
डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ