बारामती : खरंतर यंदा लाडल्या बहिणींनी मला वाचवले. खोटं सांगणार नाही, लोकसभेचा निकाल लागल्यावर विचार करंत होतो. सरकार तर आलं पाहिजे. ४०, ५० आमदार आपल्याबरोबर आलेतं. उद्या ते म्हणतील, हा घेऊन गेला. आमचं वाटुळं केलं. त्यामुळे त्यांचा वाटुळं नको व्हायला आणि आपलंही वाटोळं नको. परंतु गरिबांकरिता लाभाच्या चांगल्या योजना आणल्या. बहिणींनी त्यांच चांगलं स्वागत केंलं, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीच्या निकालाचे श्रेय लाडक्या बहिणींना दिले.
बारामती येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले, लाभ देणाऱ्या योजनांचे बहिणींनी चांगले स्वागत केले. त्यांनी आमच्या मेहुण्यांचे देखील ऐकले नाही. आत जाऊन कुठं बटण दाबायची ती दाबली. मेहुण्यांनी दुसरीकडेच दाबली. पण बहिणींनी बटणे जोरात दाबल्यामुळे आम्ही चांगल्या मतांनी निवडुन आलो. त्यामुळे उलट आमची जबाबदारी आता वाढली आहे. पाच वर्ष तुम्ही टाकलेला मतांचा भार हलका कसा होइल, यासाठी काम करणार असल्याचे पवार म्हणाले.
लोकसभेला आमचे उमेदवार ३८४ बुथवर मागे होते. केवळ ४ बुथवर पुढे होता. तर विधानसभेला ३८४ बुथवर मी पुढे आहे. ४ बुथवर मागे आहे. यामध्ये असणारे बारामतीकरांचे योगदान आयुष्यभर विसरणार नाही. बारामतीकरांसारखा मतदार देशात सापडणार नसल्याचे पवार म्हणाले. महाराष्ट्राच्या इतिहासात २८८ पैकी २३७ जागा सत्ताधारी पक्षाच्या कधीही निवडुन आल्या नव्हत्या. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर प्रथमच या जागा निवडुन आल्या आहेत. सरकारला पाच वर्ष धक्का लागायचे कारण नसल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले. विरोधक रडीचा डाव खेळत आहेत. ईव्हीएम वर बोलत आहेत. लोकसभेत आमच्या महायुतीच्या १७ जागा निवडुन आल्या आहेत. त्यांच्या ३१ जागा निवडून आल्या. जनतेने दिलेला काैल आम्ही मान्य केला. विधानसभेला लोकांनी दिलेला काैल त्यांनी मान्य करणे आवश्यक आहे. मात्र, विरोधक अजुनही रडीचा डाव खेळत असल्याचा टोला पवार यांनी लगावला.
यंदाच्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात ३ कोटी घरे बांधण्याचा वसा घेतला आहे.त्यापैकी महाराष्ट्राला ३० ते ४० लाख घरे मिळविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माझा प्रयत्न आहे.यासह विविध कामांच्या निमित्ताने मी पंतप्रधानांची भेट घेतली.त्यांनी मला अर्धा तास वेळ दिला.त्यांच्याशी विविध कामांविषयी चर्चा केली,असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.