नऱ्हे : सोलापूरहून आलेल्या तरुणीला इमारतीच्या टेरेसवर नेऊन धारदार शस्त्रांनी वार केल्याची धक्कादायक घटना नऱ्हे येथील मानाजीनगर भागात २२ सप्टेंबरला दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली होती. दरम्यान घटनेतील तरुणी प्रियांका वसंत आरेनवरु (वय २१, मु. पो. मैंदर्गी ता. अक्कलकोट जि. सोलापूर) हिला जखमी अवस्थेत उपचारासाठी ससूनला दाखल केले होते. मात्र २३ सप्टेंबरला उपचारादरम्यान तिचे निधन झाले होते. याबाबत पोलिसांनी फरार असणारा आरोपी बसवराज सिद्धप्पा हिळळी (वय २७, मूळ गाव : मु. तळेवाड पो. बोरोटी ता. अक्कलकोट जि. सोलापूर) या तरुणास आज सिंहगड रस्ता पोलिसांनी गुलबर्गा येथून ताब्यात घेतले आहे.
सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणी व आरोपी हे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील असल्याने दोघांत फेसबुकवरून मैत्री झाली, त्यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले, प्रियांका ही घटनेच्या दोनच दिवसांपूर्वी पुण्यातील बहिणीकडे राहावयास आली होती. तर बसवराज हा पुण्यामध्ये एका खासगी कंपनीत नोकरी करीत होता, व तो नऱ्हे येथील मानाजीनगर परिसरात मिंत्रासमवेत भाड्याने फ्लॅट घेऊन राहत होता. घटनेच्या दिवशी सकाळी प्रियांकाला सोबत घेऊन तो राहत असलेल्या नऱ्हे येथील फ्लॅटच्या टेरेसवर गप्पा मारण्यासाठी घेऊन गेल्यानंतर प्रेमसंबंधातून झालेल्या भांडणावरून मनात राग धरून बसवराजने सोबत आणलेल्या चाकूने तिच्या छातीवर, पाठीवर सपासप वार केले व त्यानंतर तो पळून गेला. जखमी प्रियांकाला उपचारासाठी ससूनला दाखल करण्यात आले होते मात्र उपचारदरम्यान तिचा मृत्यू झाला.सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी सर्व शक्यता गृहीत धरून आरोपीचा शोध घेण्याकरिता तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी यांच्या वेगवेगळ्या टीम तयार करून आरोपीच्या शोधासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्यात आल्या होत्या. मात्र आरोपी उच्चशिक्षित असल्याने वेळोवेळी लोकेशन बदलत होता. आरोपीबाबत मिळालेली माहिती व तांत्रिक तपास करून आरोपीला आज गुलबर्गा येथून ताब्यात घेण्यात आले. याबाबत पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले करीत आहेत.सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उप-आयुक्त पौर्णिमा गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त पी. डि . राठोड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि चेतन थोरबोले, पोलीस कर्मचारी यशवंत ओंबासे, रफिक नदाफ, दत्ता सोनवणे, अविनाश कोंडे, दयानंद तेलंगे, सचिन माळवे, राहुल शेडगे, पुरुषोत्तम गुणला, श्रीकांत दगडे, योगेश झेंडे, मोहन भुरूक, वामन जाधव, राजेंद्र सुर्वे, निलेश जमदाडे, हरीश गायकवाड, यांनी केली.