पुणे : कोरोना संकटात कोविशील्ड लसीच्या निर्मितीद्वारे पहिला आशेचा किरण जागविणारे आणि जगभरातील सर्वात मोठ्या लसनिर्मिती कंपन्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी मध्यंतरीच्या काळात एकच खळबळ उडवून दिली होती. पूनावाला यांनी आपल्याला अनेकांकडून धमक्या मिळत असल्याचा खुलासा केला होता. त्यांच्या तक्रारीची दखल घेत केंद्र सरकारने त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्याचं जाहीर केलं होतं. मात्र,मे महिन्यात अदर पूनावाला आपल्या कुटुंबासह थेट लंडनला निघून गेले होते. आता काम संपवून खासगी विमानाने ते मायदेशी परतले आहे. त्यांच्या सुरक्षा यंत्रणेचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत येण्याची शक्यता आहे.
कोरोना काळात संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले असताना सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोविशिल्ड लसची निर्मिती करत भारतासह अनेक देशांना मोठा दिलासा दिला होता. त्यानंतर वेगाने उत्पादन करत तात्काळ लसींचा पुरवठा देखील सुरु केला होता.देशात कोरोना लसीकरणाची जोरदार मोहीम सुरु असतानाच अचानक कोरोना लसींचा तुटवडा जाणवू लागल्याने मोठा गोंधळ उडाला होता. याचदरम्यान मे महिन्यात अदर पूनावाला लंडनला निघून गेले होते. त्यांनी कामानिमित्त लंडनला जात असल्याचे सांगत ते संपवून भारतात परतणार असल्याचं जाहीर केले होते.पूनावाला यांनी ‘द टाईम्स’ या युनायटेड किंग्डममधील वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आपल्याला मुख्यमंत्री ते उद्योजक अशा अनेकांकडून धमक्या मिळत असल्याचा खुलासा करत देशात एकच खळबळ उडवून दिली होती.
सिरमचे अदर पूनावाला यांनी ट्विटद्वारे लवकरच भारतात परतणार असल्याची माहिती दिली होती. याचसोबत त्यांनी ब्रिटनमध्ये भागीदार आणि भागधारकांसोबत चांगली बैठक झाली असल्याचे देखील सांगितले होते. सिरम इन्स्टिटयूट केंद्र सरकारला ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान जवळपास ५० कोटी लसींचे डोस पुरवणार आहे.
अदर पुनावाला धमकीबाबत नेमका काय खुलासा केला होता...कोविशील्ड लसींच्या मागणीसाठी भारतातील मोठ्या व्यक्तींचे वारंवार मला फोन येत असून त्यात काही राज्यांचे मुख्यमंत्री व उद्योगपतींचाही समावेश आहे. आम्हालाच लस लवकर हवी आहे, असं म्हणत त्यांच्याकडून दबाव आणला जात आहे.