संचेती हॉस्पिटलने ''वॅक्सऑल इनिशीएटीव्ह'' या नागरी समूहाच्या साहाय्याने पहिल्याच दिवशी १६९ तृतीयपंथी लोकांचे लसीकरण केले. संचेती हॉस्पिटलने केवळ तृतीयपंथी लोकांसाठी विशेष लसीकरण केंद्र सुरू केले आहे. १२ रे १५ जुलै दरम्यान ही मोहीम सुरू असणार आहे. याबद्दल पराग संचेती म्हणाले, ''सरकारने वेगाने सुरू केलेल्या लसीकरण मोहिमेला हातभार लावणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. प्रत्येक नागरिकाला वैद्यकीय सेवेची समान उपलब्धता असणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. ओघाने लसीकरण मोहीम याला अपवाद नाही. संचेती हॉस्पिटलला हा उपक्रम सुरू करताना अतिशय आनंद होत आहे. यामध्ये तृतीयपंथी लोकांशिवाय ज्यांच्याकडे स्वतःचे ओळखपत्रही नाही, अशा सर्व लोकांचे लसीकरण करण्यात येत आहे. या उपक्रमअंतर्गत आम्ही हजारो तृतीयपंथी तसेच सोयी-सुविधांपासून वंचित नागरिकांचे लसीकरण करण्याचे ध्येय आमच्यासमोर आहे.''
लक्ष्मी त्रिपाठी म्हणाल्या, ''समाजातील सर्वात आव्हानात्मक व कठीण आयुष्य असणाऱ्या वर्गासाठी हा अतिशय उपयुक्त उपक्रम आहे. या उपक्रमाचा भाग असणे हा माझ्यासाठी भाग्याचा क्षण आहे. तसेच माझ्या बंधू- भगिनींना या उपक्रमामुळे जीवदान मिळणार आहे. मी संचेती हॉस्पिटल, आदर पूनावाला आणि वॅक्सऑल यांचे मनापासून आभार मानते.''