बावडा : इंदापूर तालुक्यातील २२ गावे चासकमान विभागाला जोडण्याचे षडयंत्र हे पूर्वनियोजितच आहे. या २२ गावांच्या हक्काचे पाणी इतरत्र वळविण्याचा डाव यशस्वी होऊ देणार नाही. जर येत्या ४ दिवसांत ही २२ गावे पूर्ववत पुणे पाटबंधारे विभागाला जोडण्यात येणारा शासननिर्णय हा नव्याने काढण्यात आला नाही, तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा पंचायत समितीचे सभापती विलास वाघमोडे, नीरा भीमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी दिला आहे. मंगळवारी (दि. २५) शहाजीनगर येथे ते बोलत होते. ‘प्रिंटिंग मिस्टेक’ झाली, या नावाखाली आता लोकप्रतिनिधी शेतकरी वर्गाची दिशाभूल करीत आहेत. जबाबदारी झटकत आहेत. गेल्या दोन वर्षांत २२ गावांमधील शेतीला धरणात पाणी असतानादेखील अपुरे पाणी सोडण्यात आले, मात्र वरच्या भागातील शेतीला मुबलक पाणी मिळाले, हे येथील जनता विसरलेली नाही. अशा प्रकारे २२ गावांमधील शेतकरी हे अडचणीत असताना, ही गावे चासकमान विभागाला जोडून त्रास देऊ नका, असे आवाहन वाघमोडे व पवार यांनी केले. चुकीचा निर्णय येत्या आठवडाभरात न बदलल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असे त्यांनी सांगितले. या वेळी ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब करगळ यांनी सांगितले, की अंथुर्णे १ व २ अशा दोन शाखांना सदर शासननिर्णयात मान्यता देण्यात आली आहे. यामधील १ शाखा पुणे पाटबंधारे विभागाला जोडण्यात आली आहे, तेथे ‘प्रिंटिंग मिस्टेक’ का झाली नाही. २२ गावे चासकमान पाटबंधारे विभागाला जोडण्यात येणार आहेत, अशी माहिती लोकप्रतिनिधींना होती. इंदापूर तालुक्यातील २२ गावांच्या हक्काच्या पाण्यासाठी तीव्र लढा देतच राहणार आहे. या वेळी नीरा भीमा कारखान्याचे उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, जि.प. सदस्य देवराज जाधव, आबासाहेब शिंगाडे, विठ्ठल पाटील, धनंजय कोरटकर, रणजित रणवरे, शिवाजी शिंदे, दादा घोगरे, शिवाजी हांगे, सतीश अनपट, शंकर घोगरे, राजेंद्र देवकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
ती २२ गावे पुणे पाटबंधारेला पूर्ववत जोडा
By admin | Published: October 26, 2016 5:43 AM