लासुर्णे : इंदापूर तालुक्यातील सहाजण साताऱ्यातील कास पठारावर रविवारी सकाळी सहलीला निघाले होते. यावेळी पुणे- पंढरपूर मार्गावर नातेपुतेजवळ कारुंडे (ता. माळशिरस) येथे कार व टेम्पोचा अपघात झाला. यामध्ये जंक्शन (ता. इंदापूर) येथील व्यापारी राजेश शहा हे आपल्या कामगारांसह कारने सहलीला निघाले होते. कार व टेम्पो यांची समोरासमोर धडक बसून कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. एकाचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.
सर्व मृत इंदापूर तालुक्यातील आहेत. दोघीजणी गंभीर जखमी अवस्थेत आहेत. यामध्ये राजेश अनिल शहा (वय ५५, जंक्शन, ता. इंदापूर), दुर्गेश शंकर घोरपडे (२८, रा. लासुर्णे), कोमल विशाल काळे (३२, सध्या रा. शिरसटवाडी), शिवराज विशाल काळे (१०) जागीच ठार झाले. आकाश लोंढे यांचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. पल्लवी बसवेश्वर पाटील (३०) व अश्विनी दुर्गेश घोरपडे (२६) या जखमी झाल्या आहेत.
रेडणी गावात शोककळा
कोमल विशाल काळे व शिवराज विशाल काळे हे मूळचे रेडणी (ता. इंदापूर) येथील रहिवासी असून दोघांचा मृत्यू झाल्याने रेडणी गावात शोककळा पसरली आहे. कोमल काळे यांचे पती विशाल तुकाराम काळे यांचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले होते. लासुर्णे गावातील आकाश लोंढे व दुर्गेश घोरपडे यांचा अपघाती मृत्यू झाल्याने लासुर्णे गावावर शोककळा पसरली आहे. इंदापूरचे आमदार तथा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी लासुर्णे गावातील घोरपडे कुटुंबियांना भेट देऊन सांत्वन केले.