पुणे : शेअर मार्केट ट्रेंडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून फसवणूक केल्याचा प्रकार आंबेगाव खुर्द परिसरात घडला. याप्रकरणी रविवारी (दि.१७) भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अधिक माहितीनुसार कौस्तुभ दिलीप पंडित (वय ४१, रा. आंबेगाव खुर्द) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार हा प्रकार १३ डिसेंबर २०२४ रोजी घडला आहे. फिर्यादी यांना सायबर चोरट्याने एका व्हाॅट्सॲप ग्रुपमध्ये ॲड केले. त्यामध्ये दररोज शेअर मार्केटविषयी वेगवेगळ्या टिप्स आणि माहिती दिली जात होती. गुंतवणूक केल्यास चांगले परतावा मिळतो, असे भासवले जात होते.
बल्क ट्रेडिंग करून भरघोस नफा मिळवण्याचे आमिष दाखवून ट्रेडिंग करण्यासाठी एक ॲप डाऊनलोड करायला लावले. त्या अप्लिकेशनच्या माध्यमातून फिर्यादी यांनी एकूण १९ लाख ५३ हजार रुपयांची गुंतवणूक केली. त्यापैकी फक्त २ हजार ६०० रुपये नफा देऊन नंतर परतावा देण्याचे बंद केले. पैसे मिळालेले दिसत होते मात्र फिर्यादींना ते पैसे काढता येत नव्हते. पैसे मिळणार नाही याची खात्री झाल्यावर फिर्यादींनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.