पुणे : कोरोनाबाधित रूग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये याकरिता, २० जम्बो सिलेंंडरची क्षमता असलेले १ ड्युरा सिलेंडर असे १० ड्युरा सिलेंडर खरेदी करण्यास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. याचबरोबर नायडू रुग्णालय येथे ऑक्सिजन रिफीलींग स्टेशन उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे.
स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी याबाबत पत्रकारांना माहिती दिली. ड्युरा सिलेंडर हे गणेश कलाक्रीडा केंद्र येथील कोविड केअर सेंटरमधील ऑक्सिजन बेडकरिता आवश्यक ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी खरेदी करण्यात आले आहेत.
दरम्यान १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधित लसीकरण सुरू होणार असल्याने, पुढील काळात लसीकरणाचे काम वेगाने होण्याकरिता लसीकरणाच्या नोंदीसाठी ४२ डाटा इंट्री ऑपरेटर मासिक एकवट मानधनावर नियुक्त करण्यास समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे़
----------------------------
महापालिकेचे विद्यार्थी गिरवणार जर्मन, फ्रें च, स्पॅनिश आणि जपानी भाषेतून धडे
कोरोनामुळे वर्षभरापासून सर्व शाळा बंद असतानाही, आगामी शैक्षणिक वर्षात शाळा सुरू झाल्यावर, महापालिकेच्या इयत्ता आठवी, नववीच्या विद्यार्थ्यांंना जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश आणि जपानी भाषा शिकविण्यात येणार आहे. याकरिता नगरसेवकांनी दाखल केलेल्या प्रस्तावास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.
२० लाख रुपये खर्च असलेल्या ‘ग्लोबल पुणेकर’ या उपक्रमाअंतर्गत पुणे महापालिका व विद्याभारती इन्स्टिट्यूट फॉर फॉरेन लँग्वेजेस या संस्थेच्या माध्यमातून महापालिकेच्या आठवी आणि नववीच्या वर्गामध्ये शिक्षण घेणाऱ्या विशेषत: विद्यानिकेतन शाळेतील ४०० विद्यार्थ्यांना जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश आणि जपानी भाषा शिकविण्यात येणार आहे. पुणे शहरात परकीय भाषा शिकविणाऱ्या संस्था कार्यरत असून त्यांचे अभ्यासक्रम शुल्क अधिक असल्याने निम्न मध्यम व निम्न वगार्तील विद्यार्थ्यांना हे अभ्यासक्रम परवडत नाहीत. त्यामुळेच विद्याभारती इन्स्टिट्यूट फॉर फॉरेन लँग्वेजेस या संस्थेच्या माध्यमातून महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात वरील चार भाषांचे बेसिक व्याकरण, दैनंदीन जीवनात उपयोगी पडणारे संभाषण, सोपी वाक्यरचना ऑडीओ व्हिडीओ आणि चित्रांच्या माध्यमातूून शिकविली जाणार आहे.
-------------------------------