पुणे : मांढरदेवी यात्रेसाठी पुण्यातून जाणाऱ्या भाविकांची दरवर्षी मोठी गर्दी असते. यंदा देखील या यात्रेसाठी लाखो लोक पुण्यातून जाणार आहेत. हे लक्षात घेऊन पुणे एसटी विभागाकडून ४ ते ७ जानेवारी २०२३ दरम्यान जादा बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
पुणे एसटी विभागातून शिवाजीनगर (वाकडेवाडी), स्वारगेट, भोर, नायारणगाव, तळेगाव, राजगुरूनगर, शिरूर, बारामती, इंदापूर, सासवड, दौंड, पिंपरी- चिंचवड या बस स्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. तसेच, पौष पौर्णिमेनिमित्त नारायणपूर, थापलिंग, वरवे, कोरथन येथेही जादा बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रेनंतर पौष आमावस्येपर्यंत येणाऱ्या प्रत्येक मंगळवारी, शुक्रवारी आणि रविवारी मांढरदेवीसाठी स्वारगेट व भोर येथून या बस सोडल्या जाणार आहेत. तरी भाविकांनी या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन एसटीचे विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी केले आहे.