पुणे: बाणेर रोडवरील राज्य बिनतारी संदेश विभागाच्या मालकीचे वृंदावन लॉन्स मंगल कार्यालय भाडेतत्वावर घेऊन भाडे न देता एकाने अपर पोलीस महासंचालक कार्यालयाला तब्बल ९ लाख ४५ हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी पोलीस बिनतारी संदेश विभागाचे प्रमुख लिपिक प्रदीप नाईक यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार लक्ष्मीकांत गुंड (रा. धायरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिनतारी संदेश विभागाने बाणेर रोडवर वृंदावन लॉन्स मंगल कार्यालय उभारले आहे. धायरी येथील लक्ष्मीकांत गुंड याला १८ डिसेंबर २०१८ ते २६ मे २०१९ असे २ महिन्यांच्या कालावधीसाठी करार करण्याचे बोलीवर विश्वासाने भाडेतत्वावर घेतले होते. त्याने या काळात हे मंगल कार्यालय स्वत:चे ताब्यात ठेवले. त्याचा वापर करुन करार करण्यासाठी टाळाटाळही केली. कार्यालयाचे ९ लाख ४५ हजार रुपये भाडे देणे आवश्यक असताना ते आजपर्यंत न देता अपर पोलीस महासंचालक व संचालक पोलीस बिनतारी संदेश, पुणे कार्यालयाची फसवणूक केली आहे़.
गुंड हा पूर्वी राज्यभरात कामगार, सुरक्षा रक्षक, तसेच इतर महत्वाच्या गोष्टी पुरवणार्या एका कंपनीत काम करत होता. ते काम सोडल्यानंतर तो केटरिंगचे काम करीत असे. त्यावेळी त्याने हे लॉन्स भाड्याने घेतले होते. चतु:श्रृंगी पोलीस अधिक तपास करीत आहे.