पुणे : एलिमेंटरी व इंटरमिजिएट या चित्रकला परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आणि इयत्ता दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दिल्या जाणाऱ्या सवलतीच्या गुणांबाबत राज्य शासनाने पुनर्विचार करावा, अशी मागणी विद्यार्थी व चित्रकला शिक्षकांकडून केले जात आहे. दरवर्षी एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना या गुणांचा लाभ मिळतो. परंतु, यंदा हे गुण मिळणार नसल्याचा अध्यादेश प्रसिद्ध झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट) परीक्षा घेऊ नयेत, असा अध्यादेश राज्य शासनाने प्रसिद्ध केला आहे. तसेच २०२०-२१ या शैक्षणिक वर्षी इयत्ता दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना रेखाकला परीक्षेचे सवलतीचे अतिरिक्त गुण देऊ नयेत, असेही या अध्यादेशात नमूद करण्यात आले आहे. परंतु, काही विद्यार्थ्यांनी इयत्ता आठवी-नववी मध्येच परीक्षेची तयारी करून या दोन्ही परीक्षांमध्ये यश संपादन केले आहे. चित्रकलेची आवड आणि दहावीत मिळणारे अतिरिक्त गुण यासाठी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. त्यामुळे आपण केलेल्या परिश्रमाचे फळ मिळावे, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.
--------
माझ्यासह अनेक विद्यार्थ्यांनी दोन्ही परीक्षांमध्ये यश संपादन केले आहे. शासनाने घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्यामुळे राज्य शासनाने याबाबत पुनर्विचार करावा आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा.
- श्रीतेज कोंडे, विद्यार्थी
--------------------------
अनेक विद्यार्थ्यांनी सुमारे दोन वर्षांपासून चित्रकला परीक्षेसाठी कष्ट घेतले. त्यातून परीक्षेत चांगले ग्रेड मिळवले. परंतु, शासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळणार नाही. त्यामुळे शासनाने याबाबत पुनर्विचार करून सुधारित अध्यादेश प्रसिद्ध करावा.
- सुहानी कड, विद्यार्थी
--------------------
चित्रकला हा विषय सर्व विषयांना स्पर्श करणारा आहे. केवळ इयत्ता दहावीत अतिरिक्त गुण मिळावेत म्हणून विद्यार्थी ही परीक्षा देत नाहीत तर पुढील अभ्यासक्रमासाठी सुद्धा त्यांना या परीक्षेचा लाभ होतो. त्यामुळे शासनाने ही परीक्षा रद्द करू नये. तसेच विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुणांची सवलत देण्याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी.
- नंदकुमार सागर, चित्रकला शिक्षक
---------------
अनेक विद्यार्थी एलिमेंटरी व इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या आहेत. कोरोनामुळे परीक्षा होणार नाही, असे गृहीत धरून शासनाने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना या गुणांचा न देण्याचा चुकीचा निर्णय घेतला आहे. परंतु, पूर्वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुणांचा लाभ मिळावा, याबाबत शासनाने विचार करणे गरजेचे आहे.
- किरण सरोदे ,उपाध्यक्ष, कलाशिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य
---------------------------------
ग्रेडनुसार मिळणारे गुण
ए - ७ , बी - ५ , सी - ३
----------------------------
मागील वर्षी चित्रकलेच्या अतिरिक्त गुणांचा लाभ घेतलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांची आकडेवारी
विभाग विद्यार्थी
पुणे ३३,४६६
नागपूर ३,७३८
औरंगाबाद १०,६४१
मुंबई २६,१८३
कोल्हापूर २३,४४२
अमरावती १०,७८७
नाशिक २०,३०९
लातूर ६,९२२
कोकण ८,६९२
---------------------------------------------
एकूण १,४४,१८३