पुणे : शहरामध्ये आलेल्या महापुरात मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. या सर्व अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना शासनाच्या निणर्यानुसार अधिकचे दहा हजार रुपयांची मदत तातडीने वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत दिली. तसेच यावेळी शहराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या विविध प्रकल्पासाठी आवश्यक असलेले भूसंपादनाचे विषय देखील तातडीने मार्गी लावण्यात येतील, असे देखील राम यांनी या बैठकीत स्पष्ट केले. महापौर मोहोळ यांनी नुकतीच नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेत या भरपाईसंदर्भात पाठपुरावा केला होता. याचाच पुढचा भाग म्हणून महापौर मोहोळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते धीरज घाटे, अतिरिक्त महापालिका आयुक्त शांतनू गोयल, नगर अभियंता प्रशांत वाघमारे, उपायुक्त जयश्री लाभशेटवार यांच्यासह खातेप्रमुख उपस्थित होते. अतिवृष्टीमुळे जीवितहानी झालेल्या नागरिकांच्या कुटूंबियांना ४ लाखांची मदत देण्यात आली असून, मुख्यमंत्री सहायता निधीतून एक लाख रुपये लवकरच मिळणार आहेत. या अतिवृष्टीमुळे ४ हजार ७२१ नागरिक बाधित झाले असून, त्यापैकी ४ हजार ३०५ नागरिकांना १५ हजारांपैकी प्रत्येकी ५ हजार रुपयांची मदत देण्यात आली आह. शासनाच्या आदेशानुसार ४३५ बांधितांना १५ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे, शिल्लक ४१६ लोकांना देखी ल लवकरच वाढीव मदत वाटप करण्यात येईल, असे राम यांनी स्पष्ट केले. दरम्यान खासगी सोसायट्यांच्या सीमाभिंती बांधून देणे हे महापालिकेच्या आवाक्याबाहेर आहे. यासाठी राज्य सरकारकडून ७० कोटी रुपये उपलब्ध व्हावेत, अशी मागणी देखील महापौर यांनी बैठकीत केली.
शहरातील अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना अधिकचे दहा हजार रुपये देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 10:00 PM
पुणे शहरामध्ये आलेल्या महापुरात मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान
ठळक मुद्देमहापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्याची माहितीअतिवृष्टीमुळे जीवितहानी झालेल्या नागरिकांच्या कुटूंबियांना ४ लाखांची मदत या अतिवृष्टीमुळे ४ हजार ७२१ नागरिक बाधितशासनाच्या आदेशानुसार ४३५ बांधितांना १५ हजार रुपयांचे वाटप