पाषाण: चतु:श्रृंगी पोलिसांनी पाषाण तलावाच्याजवळ कचरा कुंडीमध्ये मिळून आलेल्या बेवारस जुळया बालकांच्या माता पित्यांचा अथक प्रयत्न करून शोध घेतला. प्रेमसंबंधमधून या मुलांचा जन्म झाला असल्याची बाब समोर आली आहे. चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये १४ जानेवारीला पाषाण तलावाजवळ महादेव मंदिराकडे जाणाऱ्या रोडवर कचराकुंडीमध्ये अज्ञात इसमाने दोन जिवंत जुळी नवजात बालके (अर्भक) एक स्त्री जातीचे व एक पुरुष जातीचे बालक वाऱ्यावर सोडून त्यांना सांभाळण्यास असमर्थता दाखवून निघून गेले होते. यानंतर या परिसरातील नागरिकांनी या मुलांचा प्राण वाचवला होता.दरम्यान चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांच्या तपास पथकाने या घटनेचा तपास केल्यानंतर पुणे शहरातील हॉस्पिटलला भेटी देऊन माहिती घेतली. या तपासात जननी नर्सिंग होम कर्वेनगर पुणे येथे १३ जानेवारीला एका इसमाने महिलेला डिलिव्हरीसाठी अॅडमिट केले होते. या महिलेची पहाटे ४.१० वा.डिलेव्हरी झाली असता तिला एक मुलगा व एक मुलगी झाली. बुधवारी (दि.१४) हॉस्पीटलमध्ये कोणास काही एक न सांगता दोन्ही मुलांना घेवून निघून गेले होते. तपासात ही माहितीसमोर आल्याने महिलेवर संशय बळावल्याने तिने सांगितलेल्या पत्यावर शोध घेतला. ही महिला मागील एक वर्षापासून तेथे राहत नसल्याचे समजले. त्या्नंतर या महिलेचा शोध घेत असताना पोलीस नाईक प्रकाश आव्हाड व सचिन कांबळे यांना मिळालेल्या माहितीवरुन व पोलीस शिपाई ज्ञानेश्वर मळे यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणावरून ही महिला वडगाव ब्रदुक भागात राहत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. अप्पर पोलीस आयुक्त सुनिल फुलारी,पोलीस उप आयुक्त पंकज देशमुख,सहा.पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराडे यांना देवून त्यांनी केलेल्या सुचनेप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे ,पोलीस निरीक्षक माया देवरे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक मोहन जाधव, राकेश सरडे, यांच्या पथकाने सदर महिला व तिचा प्रियकर यांना वडगाव येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे पाषाण तलावाच्या घटनेबाबत चौकशी केल्यावर त्यांनी गुन्हयाची कबुली दिली. दोघांचे प्रेमसंबंधातून सदरचे अपत्य जन्माला आली. सदर महिलेस पहिल्या पतीपासुन तीन मुली आहेत. मुलांना पाषाण तलाव उदयानाजवळ येथे रस्त्याचे कडेला कचरा कुंडीजवळ बुधवारी (दि.१४) सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास सोडून दिल्याचे सांगितले. याबाबत आरोपीला चतुश्रृंगी पोलिसांनी अटक केली आहे.
कचऱ्यात टाकलेल्या ‘ त्या ’ जुळ्या मुलांच्या पालकांचा पत्ता सापडला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 9:04 PM
गरीबीमुळे सोडले वाऱ्यावर : प्रेम संबंधातून जन्माला आली होते जुळे मुले
ठळक मुद्देपरिसरातील नागरिकांनी या मुलांचा वाचवला होता प्राण