पुणे : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी वापरले जाणारे रेमडेसिवीर या इंजेक्शनची पुरेशी उपलब्धता आहे. जिल्ह्यात सध्या दररोज सरासरी १६० इंजेक्शनची मागणी असून २५० इंजेक्शन उपलब्ध होत आहेत. रुग्णसंख्या कमी झाल्याने इंजेक्शनची मागणीही घटल्याचे आहे.
सध्या कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेमडेसिवीरसह फॅबीफ्लु व अन्य काही औषधे निश्चित करण्यात आली आहेत. यांसह लक्षणांनुसार काही ठराविक औषधांनाच मान्यता देण्यात आली आहे. साधारणपणे न्युमोनिया झालेल्या रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन सुरू केली जातात. जुलै महिन्यानंतर रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्याने रेमडेसिवीरची मागणीही वाढत गेली. पण मागणीच्या तुलनेत होणारा पुरवठा अपुरा पडू लागला. आधीच महागडी असलेली ही इंजेक्शन या कालावधीत वाढीव दराने विकली जाऊ लागली. इंजेक्शन मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना मोटी कसरत करावी लागत होती. इंजेक्शनसाठी अन्य जिल्ह्यांतूनही पुण्यात येणाºयांचे संख्या वाढली होती. त्यामुळे प्रशासनाकडून इंजेक्शनच्या वितरणाला एकप्रकारची शिस्त लावावी लागली.
अन्न व औषध प्रशासनावर रेमडेसिवीरची उपलब्धता व मागणी याबाबतच्या समन्वयाची जबाबदारी आहे. सध्या रुग्ण संख्या कमी झाली असून गंभीर रुग्णांचे प्रमाणही तुलनेने कमी आहे. सध्या जिल्ह्यात सुमारे ७ हजार ७०० रुग्णांवर उपचार सुरू असून त्यापैकी केवळ २ हजार रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत.
-------------
औषधसाठा पुरेसा
आॅगस्ट महिन्यात दररोज सरासरी १०१६ इंजेक्शनची मागणी होती. तर २३ डिसेंबर रोजी ही मागणी १६० पर्यंत खाली आली आहे. मागणीतील घट ८४.३ टक्के एवढी आहे. झायडस कॅडिला कंपनीकडून ‘फिक्स्ड रेट’ योजनेअंतर्गत पुणे विभागासाठी दररोज एकुण ७५० इंजेक्शन मिळतात. त्यापैकी सर्वाधिक २५० इंजेक्शन पुणे जिल्हाला उपलब्ध करून दिले जातात. खासगी रुग्णालयांमधील रुग्णांना ही इंजेक्शन केवळ २ हजार ३६० रुपयांना उपलब्ध करून दिले जात आहे.
- एस. बी. पाटील, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन, पुणे विभाग
-------------
पुणे शहरातील कोरोनाची स्थिती (दि. २५ डिसेंबर)
एकुण रुग्ण - १ लाख ७७ हजार ५८०
बरे झालेले - १ लाख ६८ हजार ६९२
उपचार सुरू - ४ हजार २८४
------------------
जिल्ह्यात रेमडेसिवीर दैनंदिन मागणी - १६० (दि. २३)
दैनंदिन पुरवठा - २५०
---------------