पुणे: गेल्या दोन दिवसांपासून गुलडेकडी येथील मार्केट यार्डातील फळभाज्या, पालेभाज्या आणि फळे, कांदा व बटाटा बाजार सुरळीतपणे सुरू झाला आहे. सोमवारी तब्बल 243 ट्रकमधून 12 हजार 362 क्विंटल शेतीमालाची आवक झाली असल्याची माहिती फळ विभागाचे प्रमुख बाबासाहेब बिबवे यांनी दिली. यामुळे आता पुणेकरांसह जिल्ह्यातील नागरिकांना मुबलक प्रमाणात फळे उपलब्ध होणार आहेत. मात्र असे असले तरी ही भाजी आणि फळे घराजवळ उपलब्ध होणार असून त्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे आणि बाजार समितीत गर्दी करू नये असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे
कोरोनाच्या धास्तीने व्यापा-यांनी बंद पुकारल्याने काही दिवस सर्व बाजार विस्कळीत झाला होता. यामुळे नागरिकांचेदेखील प्रचंड हाल झाले व भाजीपाला खरेदी करण्यासाठी सर्वत्र गर्दी सुरू केली. याबाबत जिल्हाधिका-यांनी आदेश दिल्यानंतर बाजार समिती प्रशासनाने पुढाकार घेऊन आडत्यांशिवाय बाजार सुरु केला.तसेच बाजार आवाराला शिस्त लावण्यासाठी व गर्दी कमी करण्याची विविध उपाययोजना सुरू केल्या. यासाठी पोलिस प्रशासनाची मदत देखील घेण्यात आली. तसेच एक दिवसाआड बाजार सुरू करण्याचा निर्णय घेतला. रविवारी भाजीपाल्याचा व्यवहार झाला होता. तर, सोमवारी फळे आणि कांदा बटाटा विभाग सुरू होता.
सोमवारी झालेल्या आवकेपैकी फळे आणि केळी विभागात मिळून 138 वाहनांमधून 5 हजार 857 क्विंटल मालाची आवक झाली .याबाबत श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड असोसिएशनचे उपाध्यक्ष युवराज काची यांनी सांगितले, फळ विभागात नेहमीच्या तुलनेत मालाला उठाव नव्हता. आलेल्या मालपैकी जवळपास निम्मा माल शिल्लक आहे. द्राक्ष वगळता सर्व फळांचे दर स्थिर आहेत. तर, द्राक्षांच्या दरामध्ये मात्र मागणी अभावी घसरण झाली आहे. तर कांदा-बटाटा बाजार समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत कांदा-बटाटा विभागातील 70 टक्के आडते कामावर हजर झाले होते. येथील कामकाजात करोनाच्या भीतीमुळे कामगार कमी प्रमाणात सहभागी झाले. त्याचा परिणाम, कामावर झाला. अंदाजाने वजन ठरवुन व्यवहार करण्यात आले. घाऊक बाजारात सोमवारी कांद्यास किलोस 17 ते 20 रुपये, तर बटाट्यास किलोस दर्जानुसार 20 ते 20 रुपये दर मिळाला.