लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ऑक्टोबर महिन्यात झालेल्या धुवाधार अवकाळी पावसामुळे भीमा आणि कृष्णा खोऱ्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली होती. यामुळेच सध्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा शिल्लक आहे. धरणांतील शिल्लक पाणीसाठा जपून वापरल्यास यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार नाही.
मागील काही वर्षांत ऐन उन्हाळ्यात भीमा-कृष्णा खोऱ्यातील धरणसाठ्याने तळ गाठले होते. यामुळे उन्हाळ्यात गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली होती. परंतु, यंदा सर्वत्र चांगला पाऊस झाला. यामुळे भीमा खोऱ्यातील कुकडी प्रकल्पातील काही धरणे वगळता बहुतेक सर्व धरणे ओव्हरफ्लो झाली होती. त्यानंतर देखील ऐन ऑक्टोबर महिन्यात संपूर्ण जिल्ह्यात धुवाधार अवकाळी पाऊस झाला. याचादेखील चांगला परिणाम झाला आहे. सर्वच धरणांत पुरेसा पाणीसाठा शिल्लक आहे. धरणांतील पाणीसाठ्याचे शेती आणि पिण्याचे पाणी राखीव ठेवण्यासाठीचे सर्व नियोजन नुकत्याच झालेल्या कालवा समितीच्या बैठकांमध्ये झाले आहे. यामुळे शेतीसाठी निश्चित झालेली आवर्तन व त्यानुसार पाणी सोडल्यास यंदा शेतीसह पिण्याच्या पाणीटंचाई निर्माण होणार नाही.
--
धरणांतील पाणीसाठ्याची माहिती
धरण क्षमता (टीएमसी) आजचा साठा टक्केवारी
टेमघर ३.७१ ०.५१ १३.८२
वरसगाव १२.८२ ९.४३ ७३.५२
पानशेत १०.६५ ९.०७ ९१.१६
खडकवासला १.९७ ०.९९ ४९.९७
पवना ८.५१ ५.४० ६३.४२
मुळशी १८.४७ ८.७३ ७४.४८
चासकमान ७.५८ ५.२३ ६८.९९
भामा आसखेड ७.६७ ६.०६ ७९.०६
गुंजवणी ३.६९ २.५१ ६८.१२
भाटघर २३.५० १८.१६ ७७.२६
नीरा देवघर ११.७३ ७.७५ ६६.०७
वीर ९.४१ ५.६६ ६०.०७
माणिकडोह १०.१७ १.६६ १६.३०
येडगाव १.९४ १.७३ ८८.७०
डिंभे १२.४९ ९.०० ७२.०५
उजनी ५३.५७ ३४.४७ ६९.९४
कोयना १००.१४ ७१.९८ ७१.८९
वारणा २७.५५ ५.३४ ६८.७२