चाकण : माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्याने त्यांच्यासोबत खेड तालुक्यातील कोण जाणार, याची उत्सुकता कट्टर शिवसैनिकांमध्ये निर्माण झाली होती. परंतु चाकण येथे शिवसेनेच्या झालेल्या बैठकीत उपस्थित शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहण्याची वज्रमूठ बांधली आहे. यावेळी आढळराव पाटील यांच्या निषेधार्थ घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
यावेळी जिल्हा सहसंपर्कप्रमुख अशोक खांडेभराड, तालुकाप्रमुख रामदास धनवटे, उपजिल्हाप्रमुख शिवाजी वर्पे, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, विजयसिंह शिंदे, प्रकाश वाडेकर, नितीन गोरे, शिंदे, शहराध्यक्ष महेश शेवकरी, लक्ष्मण जाधव, साहेबराव कड, प्रकाश गोरे, सुभाष मांडेकर, राहुल गोरे, सुरेश चव्हाण यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आढळराव पाटील यांनी अचानक घेतलेला निर्णय खेड तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये कमालीचा संभ्रम निर्माण करणारा ठरेल, असे अनेकांना वाटत होते. परंतु तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी स्वर्गीय माजी आमदार सुरेश गोरे यांच्या कार्यालयात घेतलेल्या बैठकीत मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी हजेरी लावून आढळराव पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेचा धिक्कार केला. यावेळी खांडेभराड यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, शिवसेनेच्या भरवशावर मोठी पदे भुसवणाऱ्या आढळराव पाटील यांनी पक्षाशी गद्दारी केली आहे. त्यांना खेड तालुक्यातील एकही शिवसैनिकांचे समर्थन देणार नाही.
मागील काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. ती योग्य असल्याचे तालुकाप्रमुख रामदास धनवटे यांनी सांगितले. खेड तालुक्यातील शिवसैनिकांच्या भरवशावर खासदारकी उपभोगलेल्या आढळराव पाटील यांना यापुढे तालुक्यातून एकही मत मिळणार नाही. यावेळी संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी व्हिडिओ कॉलमार्फत उपस्थित शिवसैनिक पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले. तसेच शिवसैनिकांनी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर आपण शिवसेनेशी एकनिष्ठ असल्याचे प्रमाणपत्र लिहून दिले आहे.