पुणे : ससूनच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केलेली आदिती गेल्या पाच दिवसांपासून अभ्यास न झाल्यामुळे घरी तणावात हाेती. तिचे समुपदेशन करण्यासाठी घरच्यांनी मानसाेपचारतज्ज्ञालाही दाखवले हाेते. बुधवारी प्रॅक्टिकलची परीक्षा देण्यासाठी ती बीजेमध्ये आली खरी; मात्र अभ्यास न झाल्याच्या तणावात जुन्या अपघात विभागाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून तिने जीवन संपवले. यामुळे वैद्यकीय अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमधील अभ्यासाबाबतचा ताणतणाव समाेर आला आहे.
आदिती दलभंजन ही बीजे मेडिकल काॅलेजमध्ये एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिकत हाेती. मूळची गुजरातचे असलेली आदिती कुटुंबीयांसाेबत सध्या सिंहगड रस्ता परिसरात राहत हाेती. तिचे वडील तिला काॅलेजमध्ये साेडण्यासाठी येत असत. बुधवारी तिचे बायाेकेमिस्ट्री विषयाचे प्रात्यक्षिक हाेते. परंतु, गेल्या चार दिवसांपासून घरी ती ‘मी अभ्यास केला नाही. अभ्यास करायला हवा हाेता’ अशा प्रकारे तणाव व्यक्त करत हाेती. याबाबत घरच्यांनी तिला मानसाेपचारतज्ज्ञालाही दाखवले. त्यासाठी मानसाेपचारतज्ज्ञांनी गाेळ्याही दिल्या; मात्र गाेळ्या खाल्ल्याने झाेप येईल व अभ्यासावर परिणाम हाेईल म्हणून तिने त्या घेतल्याही नव्हत्या, अशी माहिती समाेर आली आहे.
आदितीचे इंजिनिअर असलेले वडील बुधवारी सकाळी दहाच्या दरम्यान तिला बीजेमध्ये घेऊन आले व प्रॅक्टिकल परीक्षेसाठी साेडले. तसेच परीक्षा हाेईपर्यंत ते कॅन्टीनमध्येच थांबले. परंतु, आदितीच्या मनात वेगळेच विचार हाेते. तिने परीक्षेला गेल्यासारखे दाखवले. परंतु, ती जुन्या कॅज्युअल्टीच्या तिसऱ्या मजल्यावर गेली. तेथून बहुदा खिडकीतून इमारतीच्या बाहेरील माळ्यावर आली आणि क्षणार्धात साडेदहाच्या दरम्यान उडी घेतली. यात तिच्या डाेक्याला जबरदस्त आघात झाला. बरगड्या, मनगट यांनाही जाेराचा मार लागला हाेता.
तिने उडी मारली तेव्हा वडील हाेते कॅन्टीनमध्ये
आदितीने उडी घेतल्यावर तिला हाकेच्या अंतरावर असलेल्या कॅज्युअल्टीमध्ये तत्काळ दाखल करण्यात आले. दरम्यान, तिने पांढरा ॲप्रन घातलेला हाेता; परंतु तिच्याकडे ओळखपत्रही नव्हते. त्यामुळे ती काेणत्या वर्षाची विद्यार्थिनी आहे हे कळतही नव्हते. अशा प्रकारे एक तास गेला. शेवटी तिच्या फाेनमधून घरच्यांचा नंबर काढून वडिलांना काॅल केला असता ते बीजेच्या कॅन्टीनमध्ये हाेते. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
उपचारांची शर्थही ठरली अपयशी :
आदितीने उडी घेतल्यावर तिला कॅज्युअल्टीमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. मेडिकल तसेच सर्जरी विभागाच्या वरिष्ठ डाॅक्टरांनी सर्व प्रकारचे आवश्यक ते उपचार सुरू केले; परंतु तिच्या डाेक्याला मार जास्त असल्याने शेवटी तास ते दीड तासानंतर तिची प्राणज्याेत मालवली. त्यानंतर कुटुंबीयांनी तिचे डाेळ्यांचे दान केले.
आईवडिलांसह नातेवाइकांचा शाेक-
आदितीचे वडील तेथेच हाेते. त्यांनाही उशिरा माहिती मिळाली त्यानंतर तिची आई, भाऊ व इतर नातेवाईक ससूनमध्ये आले. आदितीच्या आठवणीने शाेक अनावर झाला. तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यावर मृतदेह घरच्यांच्या ताब्यात देण्यात आला.
हाॅस्पिटलच्या इमारतीवरून उडी मारल्यानंतर तिच्या डोक्याला, बरगाड्याला मार लागला व ती बेशुद्ध झाली. तिला तत्काळ तातडीच्या कक्षात दाखल करून तिच्यावर तज्ज्ञ डाॅक्टरांच्या मदतीने सर्व प्रकारचे उपचार केले; परंतु दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला. तिने अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या केल्याचे कळते. आदितीच्या अभ्यासाच्या तणावाबाबत आमच्या फॅकल्टीला काहीही माहीत नव्हते. असे काेणत्याही विद्यार्थ्याच्या बाबतीत हाेत असेल तर पालकांनी आम्हाला कल्पना द्यावी. याबाबत नक्कीच मदत करण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांनीही याबाबत शिक्षकांना अवगत करावे. त्यांचे याेग्य प्रकारे समुपदेशन केले जाईल.
-डाॅ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, ससून रुग्णालय.