पुणे : सुंदरा मनामध्ये भरली, माझ्या नवऱ्याची बायको अशा मालिकांसह नाटक आणि चित्रपटांमधून घराघरात पोहोचलेली सर्वांची लाडकी अभिनेत्री आदिती द्रविड हिला बर्लिन चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘इजाद’ चित्रपटासाठी हा सन्मान मिळाला. विशेष म्हणजे, या चित्रपटात आदिती ही एकमेव कलाकार असून, हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषेत या चित्रपटाचे शूटिंग करण्यात आले आहे.
मुक्तायन आर्ट अँड एंटरटेन्मेंट या आदितीच्याच कंपनीने हा चित्रपट निर्मित केला असून, पीयूष कुलकर्णी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाविषयी ‘लोकमत’शी बोलताना आदिती द्रविड म्हणाली, ‘कोरोना संकटकाळात लॉकडाऊनमध्येही आम्हाला क्रिएटिव्हिटी शांत बसू देत नव्हती. एक हक्काची टीम आणि प्रत्येक जण वैयक्तिक स्तरावर काम करतोय, तर मग एकत्र येऊन चांगली कलाकृती का करू नये, असे वाटल्याने ‘इजाद’च्या निर्मितीचा विचार पुढे आला. ‘इजाद’चा तांत्रिकदृष्ट्या अर्थ ‘सायंटिफिक इनव्हेशन’ किंवा ‘डिस्कव्हरी’ असा हाेताे. चित्रपटाच्या अंगाने विचार केल्यास ‘इजाद’चा अर्थ ‘आत्मशोध’ हाेताे. हा एकपात्री चित्रपट आहे.’
‘इजाद’ हा चित्रपट माझ्यासाठी आव्हानात्मक आणि रोमांचक होता. आम्ही त्याच्या कार्यशाळा, अभिवाचन केले. भाषेवर उत्तम प्रभुत्व येण्यासाठी मी उर्दूचे धडे गिरविले. खरं तर एकपात्री भूमिका कशी करायची, त्याबाबतचे कोणते संदर्भ नव्हते. त्यामुळे अभ्यास स्वत:लाच करावा लागला. आज विविध महोत्सवांमध्ये हा चित्रपट गेला असून, मद्रास, कोलकातासारख्या प्रतिष्ठित १२ महोत्सवांमध्ये चित्रपटाचे प्रदर्शन झाले, असेही आदिती द्रविड हिने सांगितले.
दखल घेतली गेल्याचा अधिक आनंद
आम्ही फक्त मनातली कलाकृती उभी केली. आता ते सर्वस्वी प्रेक्षकांच्या हातात आहे. आम्ही हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित करण्यासाठी नव्हे, तर ओटीटीवरच तो पाहता येईल, याच अनुषंगाने तयार केला आहे. त्याकरिताच भाषेचे माध्यम हिंदी आणि इंग्रजी ठेवले आहे. बर्लिन चित्रपट महोत्सवात एका भारतीय नावाची दखल घेतली गेली, याचा अधिक आनंद आहे, असेही आदिती द्रविड हिने सांगितले.
बर्लिन चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मला जाहीर झाला, यावर पहिल्यांदा विश्वासच बसला नाही. आता त्या भूमिकेसाठी मेहनत घेतल्याचे चीज झाल्यासारखे वाटले.
- आदिती द्रविड, प्रसिद्ध अभिनेत्री