आता द्राक्षे आंबट वाटू लागली; मुख्यमंत्र्यांची शरद पवारांवर खोचक टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 11:19 AM2019-09-15T11:19:11+5:302019-09-15T11:43:34+5:30
शनिवारी सायंकाळी उशिरा पुण्यात भाजपाचीमहाजनादेश यात्रा पोहोचली होती.
पुणे : मुख्यमंत्र्यांच्या यात्रेसाठी झाडे तोडल्याने वाद निर्माण झाला होता. यावर मुख्यमंत्र्यांनी एकही झाड तोडलं असेल तर कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच आरे वृक्षतोडीवरून शिवसेनेचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनाही आवाहन केले आहे.
शनिवारी सायंकाळी उशिरा पुण्यात भाजपाचीमहाजनादेश यात्रा पोहोचली होती. यामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागला. आज सकाळी फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी सरकारने केलेल्या कामांची माहिती दिली. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही खोचक टीका केली.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हुंकार भरण्यासाठी शरद पवार राज्याच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले आहे. चांगली गोष्ट आहे की पवार दौऱ्यावर चालले आहेत. जे द्राक्ष मिळत नाही ते आंबट म्हणण्याची राष्ट्रवादीची रीतच आहे. आता कोणतीही मेगाभरती नाही. शिवस्वराज्य यात्रा उदयनराजेंनी करावी, अशी राष्ट्रवादीची इच्छा होती. उदयनराजे भाजपात आलेल्याचा आनंदच आहे. ते पुन्हा लोकसभेला निवडून जातील. मोठ मोठे नेते भाजपात येत आहेत, हे चांगलेच लक्षण आहे, असे फडणवीस म्हणाले.
दरम्यान, बारामतीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या यात्रेसाठी झाडे तोडल्याने वाद निर्माण झाला होता. यावर मुख्यमंत्र्यांनी एकही झाड तोडलं असेल तर कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले. झाडांची कत्तल आम्हालाही मंजूर नाही. आरेमध्ये मेट्रोच्या कारशेडसाठी 13 हजार हरकती आल्या. बहुतांश हरकती ऑनलाईन बंगळुरूवरून आल्या होत्या. आदित्य ठाकरे यांनी याला विरोध करणाऱ्यांच्या मनात काय हेतू आहे त्याचा विचार करावा. सर्वोच्च न्यायालयाने जे निर्णय दिले त्यांना अधीन राहून आम्ही काम करत आहोत. ही वनांची जमीन नाही. ही सरकारी जमीन आहे. आम्ही दुसरीकडे अनेक झाडे लावली आहेत, असे फडणवीस म्हणाले.
सिंचन घोटाळ्याचा तपास पूर्णत्वाला गेला असून, आम्ही सर्व पुरावे दिले आहेत. पुढच्या 5 वर्षांत दुष्काळ मुक्त महाराष्ट्र करण्यावर भर दिला जाणार असल्याचे फडणवीस म्हणाले.