पुणे : तुमच्या मुलांमध्ये गुणवत्ता नाही. म्हणून तुमची शाळा बंद करून त्यांना हुशार मुले असलेली ३.५० किमी अंतरावरील माळेवाडी येथील शाळेत समायोजन करत आहोत. असे लेखी पत्रच शेलारपट्टा येथील पालकांना गटशिक्षण अधिकारी राजकुमार बामणे यांनी दिले. या वेळी शिक्षिका व केंद्रप्रमुख कृष्णा हेळकर हेदेखील उपस्थित होते. शाळा बंद करण्याचे हे अजब कारण पाहून येथील पालकांत व नागरिकांमध्ये मोठे संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.आमच्या मुलांमध्ये गुणवत्ता नाही तर मग इतकी वर्ष आपले शिक्षक या शाळेवर दररोज येऊन नेमके काय करत होते, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. इतकी वर्ष येथे शिकवणाऱ्या शिक्षिकेला दिला गेलेला पगारदेखील वायाच गेला. तोदेखील शासनाने वसूल करून शासन जमा करावा. अशी संतप्त प्रतिक्रिया पालक शंकर नगरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. त्याचबरोबर आमची मुलं मंदच आहेत आणि मला व माझा पत्नीला दररोज मोलमजुरी करूनच पोट भरावे लागते. त्यामुळे मी माझ्या मुलीला रोज माळेवाडीला शाळेत सोडायला किंवा आणायला जाऊ शकत नाही. शाळा माळेवाडी येथे समायोजित केली तशी आमच्या मुलांची नेण्याची व आण्याची सोय करावी. आणि काय आमची मुलं माळेवाडी येथे गेल्यावर हुशार होतील, याची लेखी हमीदेखील गटशिक्षण अधिकाऱ्यांनी द्यावी. तरच आमची मुलं माळेवाडी येथे पाठवायला काही हरकत नाही. असे मत पालक शंकर नगरे यांनी व्यक्त केले. तरी या वेळी सोमनाथ शिंदे, स्वप्निल काळे, रामदास इंजे, शिवाजी भोई, सुनील नगरे, मल्लापा नाटेकर, शंकर नगरे, विकी जावळे, महादेव इंजे, चंद्रकांत जावळे तरी लवकरात लवकर ही शाळा सुरू करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणाºया शिक्षकेची चौकशी करावी, अशी मागणी करत आहेत
विद्यार्थ्यांची साडेतीन किमीची पायपीटशेलारपट्टा येथील शाळा माळेवाडी येथील शाळेत कागदोपत्री समायोजन केले, तरी या मुलांना ३.५० किमी दररोज चालत जाणे शक्य नाही. शिवाय, येथील जायचा रस्तादेखील खूप खराब आहे.शिवाय पावसाळ्यात तर अक्षरश: जीव मुठीत घेऊन नागरिकांना प्रवास करावा लागतो. मग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा तर विचारच करायला नको.
विद्यार्थ्यांची गुणवता कमी असण्यापाठीमागे शिक्षकांचा नाकर्तेपणा आहे. उलट विद्यार्थ्यांची गुणवत्ता कमी झाल्याबद्दल शाळा बंद न करता त्या शिक्षकांवर कारवाई करावी.
- बाळासाहेब काळे, पंचायत समिती सदस्य
आम्ही जिल्हा परिषदेच्या आश्वासनांचे पालन केले आहे. - राजकुमार बामणे, गट शिक्षण अधिकारी