बारामतीत प्रशासन 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; सकाळी ९ ते रात्री ७ पर्यंतच दुकाने राहणार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 05:46 PM2021-03-22T17:46:48+5:302021-03-22T17:47:31+5:30

बारामतीत दिवसेंदिवस कोरोना डोके वर काढू लागला आहे.

Administration in Baramati in 'Action Mode'; Shops will be open from 9 am to 7 pm | बारामतीत प्रशासन 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; सकाळी ९ ते रात्री ७ पर्यंतच दुकाने राहणार सुरू

बारामतीत प्रशासन 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; सकाळी ९ ते रात्री ७ पर्यंतच दुकाने राहणार सुरू

Next

बारामती : बारामती शहर व तालुक्यामध्ये सातत्याने वाढत असलेल्या कोरोना रूग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. मंगळवार (दि.२३) पासून अत्यावश्यक सेवा वगळून सकाळी नऊ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरू ठेवण्यात येणार आहेत. प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, शहरातील सूर्यनगरी व गणेश मंडई परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र
म्हणून जाहिर करण्यात आले असून पुढील आदेश येईपर्यंत या परिसरातील सर्व व्यवहार, दुकाने बंद राहणार आहेत. हा निर्णय घेण्याअगोदर उपविभागीय अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांची बैठक बोलावून त्यांनाही या बाबत विश्वासात घेत पूर्वकल्पना दिली. सूर्यनगरी व मंडई परिसर हा हॉटस्पॉट ठरला आहे. संध्याकाळी सातनंतर बारामतीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणतेही व्यवहार सुरु राहणार नाहीत, लोकांनीही अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त रस्त्यावर येऊ नये, विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर पोलिस कारवाई करणार आहेत. जे दुकानदार सॅनेटायझर, ग्राहकांच्या नोंदी तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. हॉटेल चालकांना संध्याकाळी सात ते दहा वाजेपर्यंत पार्सल सेवा देण्यास मान्यता देण्यात आली आहे. मास्कसंदर्भात पोलिसांकडून प्रभावी कारवाई होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.

दरम्यान आजपासून पोलिस ही कारवाई वेगाने करणार आहेत. दुसरीकडे एमआयडीसी परिसरातही रुग्ण वाढू लागल्याने त्याबाबत उपविभागीय अधिकारी उपाययोजना करणार आहेत. उद्यापासून नटराज नाट्य कला मंडळ तिसरे कोविड केअर सेंटर तारांगण वसतिगृहाशेजारी सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती किरण गुजर यांनी दिली.

नटराजच्या दोन कोविड केअर सेंटरची २०० रुग्णांची क्षमता संपल्याने आता तिसरे सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मेडिकल कॉलेज, नटराजची दोन्ही सेंटर्स, सिल्व्हर ज्युबिली व रुई ग्रामीण रुग्णालय सध्या हाऊसफुल्ल अवस्थेत आहे. त्यामुळे आता तिसरे सेंटर सुरु करण्याचा निर्णय झाला आहे. दरम्यान, शहरात अधिग्रहीत केलेल्या सोळा रुग्णालयांची स्वत: डॉ. काळे व डॉ. मस्तुद प्रंताधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जागेवर जाऊन पाहणी करणार आहेत. ज्यांना ऑक्सिजनची आवश्यकता नाही अशा रुग्णांना जनरल वॉर्डात हलवून तेथे ज्यांना ऑक्सिजनची आवश्यकता भासू शकते अशा रुग्णांसाठी बेड रिकामे करण्याचा हा प्रयत्न असेल.

दरम्यान, शहरातील हातगाडी चालक, फेरीवाले यांच्याही आरटीपीसीआर तपासण्या करण्याचा निर्णय झाला आहे. बारामती शहरातील साडेसातशे फेरीवाल्यांची यादी काढण्यात आली असून त्यांच्याही तपासण्या केल्या जाणार आहेत. बारामतीतील तपासणीबाबत गेल्या काही दिवसात बारामती नगरपालिकेने युध्दपातळीवर सर्वेक्षण करत शहरातील जवळपास ८० हजार लोकांची तपासणी केली आहे. निजंर्तुकीकरण करण्यासाठी शहरात नगरपालिका भाडेतत्त्वावर ट्रॅक्टर घेणार आहे. या माध्यमातून औषध फवारणी केली जाणार आहे. 

यावेळीे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे,तहसिलदार विजय पाटील, मुख्याधिकारी किरणराज यादव, डॉ. सदानंद काळे, उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, गटनेते सचिन सातव,संभाजी होळकर आदी उपस्थित होते.
—————————————

Web Title: Administration in Baramati in 'Action Mode'; Shops will be open from 9 am to 7 pm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.