पुणे: रिक्षासाठी कर्ज दिलेल्या कंपन्या वसुलीसाठी करत असलेल्या बेकायदेशीर कारवाईने त्रस्त झालेले रिक्षाचालक ऐन दिवाळीत काळी दिवाळी व लाक्षणिक उपोषण करणार आहेत. रिक्षा पंचायतीने यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याचबरोबर दिवाळी काळात १० टक्के भाडेवाढ द्यावी या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ आता स्टिकरच्या द्वारे थेट प्रवाशांनाच तसे आवाहन करण्यात येणार आहे.
पंचायतीचे सरचिटणीस नितिन पवार यांनी सांगितले की, खासगी वित्तीय कंपन्यांनी रिक्षाचालकांना वेठीस धरण्याचे प्रकार सुरू केले आहेत. ऐन दिवाळीत केल्या जाणाऱ्या या कारवाईने रिक्षाचालक वैतागले आहेत. रिक्षाचालकांचे हप्ते थकले असले तरीही रिक्षा ओढून नेणे, रोजगाराचे साधनच नष्ट करणे, चारचौघांसमोर नियमबाह्य पद्धतीने त्रास देणे असे प्रकार सुरू आहेत. त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी आळा घालणे गरजेचे आहे, मात्र तक्रार केल्यानंतरही त्याची दखल घेतली जात नसल्याने नाईलाजाने काळी दिवाळी व उपोषणाचा निर्णय घ्यावा लागत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवाळीच्या पहिल्या दिवशी (दि.९) एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करतील. त्याचबरोबर काळी दिवाळी साजरी करतील अशी माहिती पवार यांनी दिली. एसटी महामंडळाला दिवाळी कालावधीच हंगामी भाववाढ दिली जाते, त्याचप्रमाणे रिक्षाचालकांनाही दिवाळी काळात त्यांच्या नियमीत भाडे दरात १० टक्के वाढ द्यावी अशी मागणी पंचायतीने केली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे आता रिक्षाचालक थेट प्रवाशांना हे आवाहन करतील, त्या आशयाचे स्टिकर प्रत्येक रिक्षात चालकाच्या मागील बाजूस प्रवाशांना दिसेल अशा पद्धतीने लावण्यात येतील असे पवार यांनी सांगितले.
प्रवाशांना १० टक्के भाववाढ देण्याचे आवाहन करणाऱ्या स्टिकर्समधील पहिले स्टिकर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्या हस्ते एका रिक्षावर लावण्यात आले. ही स्टिकर्स पंचायतीच्या कार्यालयात निर्मिती खर्चात उपलब्ध आहेत.- नितीन पवार, सरचिटणीस रिक्षा पंचायत