पळसदेव : इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात तीव्र पाणीटंचाई जाणवत असताना प्रशासन मात्र उदासीन आहे. अनेक ठिकाणी स्वत: ग्रामपंचायत ने पाणी टँकर सुरू केले आहेत. लोकांची तहान भागविण्यासाठी अनेक ग्रामपंचायती दररोज हजारो रुपये खर्च करत आहेत. मात्र प्रस्ताव पाठवून सुध्दा प्रशासनाने टँकर सुरू केलेले नाहीत. त्यामुळे लोकांना आहे तहान. ...अन् प्रशासन उदासिन अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.पाणी नसल्याने अनेक ठिकाणी लोकांना काम धंदा सोडून पाण्याचा टँकर कधी येणार याची वाट पाहत ताटकळत थांबावे लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पाण्याचा टँकर आला की, पाणी भरण्यासाठी लोकांची झुंबड उडत आहे. यावरून पाण्याची टंचाई व दुष्काळाची दाहकता काय आहे याचा प्रत्यय येतो. एवढी भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असताना शासनाचा एकही अधिकारी फिरकताना दिसत नाही. यावरून प्रशासन किती तत्पर याचा प्रत्यय येतो. शासनाचे अधिकारी कागदोपत्री काम करतात. मात्र लोकांना पाणीटंचाईचा त्रास होतो. याबाबत भादलवाडी गावच्या सरपंच राणीताई कन्हेरकर यांनी सांगितले की, गेली दीड महिन्यांपासून आम्ही स्व: खर्चाने कंपनी मधून टँकरने पाणी आणत आहोत. डाळज क्रमांक २ चे सरपंच अॅड. प्रदीप जगताप यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, आम्ही तहसीलदार मॅडम यांची भेट घेतली असता, त्यांनी सांगितले की, तुमचे गाव बॅकवॉटर पट्टयात आहे. तसेच दोन किलोमीटर हद्दीत विहीरी आहेत. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांना पाणी मिळणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ............आम्ही येथील प्रस्ताव प्रांताधिकारी यांच्या कडे पाठविला आहे. लवकरच टँकर सुरू होईल.-सोनाली मेटकरी, तहसिलदार, इंदापूर.
इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात '' घशाला तहान, उदासिन प्रशासन''...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 1:13 PM