पुणे : महापालिकेचा ‘व्हॅक्सिन ऑन व्हील्स’ हा उपक्रम चांगला असला तरी जनतेने निवडून दिलेल्या नगरसेवकांवर अविश्वास दाखविणारे प्रशासन खासगी व चॅरिटेबल संस्थांवर विश्वास दाखवते. हा कारभार अत्यंत चुकीचा असल्याचे मत काँग्रेसचे गटनेते आबा बागूल यांनी व्यक्त केले आहे.
‘व्हॅक्सिन ऑन व्हील्स’ या उपक्रमाबाबत प्रशासनाने कोणत्याही लोकप्रतिनिधींना व पक्षनेत्यांना विश्वासात घेतले नाही की याबाबत काही माहिती दिली. ज्या खासगी संस्था मोबाइल व्हॅनच्या माध्यमातून लसीकरण करणार आहेत त्यांना महापालिका कोणत्या अधिनियमाखाली लस उपलब्ध करून देणार, असा प्रश्न बागूल यांनी उपस्थित केला.
महापालिकेतील कारभार लोकप्रतिनिधींना गृहीत धरूनच चालू आहे. याचा खेद सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना करण्याशिवाय गत्यंतर नाही, असे बागूल म्हणाले. याविषयी आयुक्तांनी खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली.