भीमाशंकर : श्रीक्षेत्र भीमाशंकर श्रावणी सोमवार यात्रा यावर्षी कोरोनानंतर पहिल्यांदाच मंगलमय वातावरणात होत आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच प्रचंड गर्दी दिसत असून, यात्रेचे नियोजन भीमाशंकर देवस्थान व प्रशासन करत आहे. भीमाशंकरकडे येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी सतत नियोजन केले जात असल्याचे भीमाशंकर देवस्थान संस्थानचे अध्यक्ष ॲड. सुरेश कौदरे यांनी सांगितले.
देवस्थानने जोरदार तयारी केली असून, एसटीच्या जादा गाड्या, आरोग्य सुविधा, दर्शनबारी, पाणीपुरवठा आदी अनेक गोष्टींची तयारी केली आहे. यासाठी प्रांत अधिकारी सारंग कोडोलकर, आंबेगाव तहसीलदार रमा जोशी यांनी भीमाशंकर श्रावण यात्रेनिमित्त विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी, देवस्थान विश्वस्त यांच्या वारंवार बैठका व प्रत्यक्ष पाहणी करून यात्रेबाबत सूचना केल्या आहेत.
यावर्षी भीमाशंकर श्रावण महिना यात्रा स्वच्छ व प्लॅस्टिकमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला असून प्लॅस्टिक वापरावर बंदी घालण्यात आली आहे. बाहेरून येणाऱ्या भाविकांनी प्लॅस्टिक घेऊन येऊ नये अथवा भीमाशंकरमध्ये कोठेही कचरा घाण टाकू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच वाहनतळ ते भीमाशंकर बसस्थानकापर्यंत एसटी महामंडळाच्या मिनीबस ठेवण्यात आल्या आहेत. श्रावणी सोमवार व महाशिवरात्र यात्रेत पूर्वी येत असलेल्या अडचणी विचारात घेऊन बंदोबस्तात बदल करण्यात आला आहे. घोडेगाव व खेड या दोन पोलीस ठाण्यांनी आपला वेगवेगळा बंदोबस्त नेमला आहे.
श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे बॉम्बशोधक पथक, गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, दर्शनबारीत यात्रेकरूंची तपासणी, मंदिराजवळ व पाहिऱ्यांच्या सुरुवातीला वॉच टॉवर, डॉगस्कॉड, हँडमेटल डिडेक्टर अशा विविध अत्याधुनिक यंत्रणांसह दंगा काबूच्या २ पथकांसह घोडेगाव पोलिसांनी १९ अधिकारी, ९० पोलीस कर्मचारी, ३० होमगार्ड असा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.
पोखरी घाट ते श्रीक्षेत्र भीमाशंकरदरम्यान धांगडधिंगा घालणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी फिरते पथक तैनात करण्यात आले असल्याचे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी सांगितले.