पुणे: पुण्यात कोरोनाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांना उपचारासाठी बेड उपलब्ध नसल्याने प्रशासनाकडून खासगी आणि सरकारी दोन्ही रुग्णालयात बेड वाढवण्यावर भर दिला जातोय. त्याच धर्तीवर ससूनमध्ये प्रशासनाने बेड वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पण बेड वाढवण्याबरोबरच मनुष्यबळ, मेडिकल साहित्य, ऑक्सिजन, हे वाढवण्यावर लक्ष दिले जात नाही. म्हणून येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टर या गोष्टीला विरोध करत मनुष्यबळ वाढवण्याचीव मागणी केली आहे.
कालच पालकमंत्री अजित पवार यांनी ससूनमधले बेड वाढवणार नाही. अस जाहीर केलं होतं. पण आमच्यापर्यंत हा निर्णय लेखी पोहोचत नाही तोपर्यंत आम्ही केवळ क्रिटिकल सेवा पुरवू. असे डॉक्टरांच म्हणणं आहे. तसेच डॉक्टरांच्या काही मागण्यांकडेही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने त्यांनी बारा तासाच्या आत मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. त्याचे पडसाद महाराष्ट्रातील प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात उमटतील असा इशारा प्रशासनाला दिला आहे.
सध्या ससूनमध्ये ५५० कोरोना आणि ४५० इतर रुग्ण आहेत. मात्र निवासी डॉक्टरांची संख्या केवळ ४५० आहे. आणखी ३०० बेड वाढवले तर १०० डॉक्टरांची गरज भासणार आहे. आम्ही सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठीच आहोत. रुग्णसेवा अविरत चालू आहे. गेल्या एक दीड महिन्यापासून आमच्या काही मागण्या प्रलंबित आहेत. प्रशासन त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे. डॉक्टरांच्या सर्व अडचणी आणि त्यावरील उपायही आम्ही प्रशासनाला सुचवून दिले आहेत. पण ते याची दखल घेत नाहीत. असेही त्यांनी सांगितले आहे.
डॉक्टरांना आयसोलेशनची सुविधा नाही
मागच्या वर्षी कोरोना काळात आम्ही रुग्णांची अविरत सेवा चालू ठेवली होती. आमची ड्युटी संपल्यावर प्रशासनाकडून इथेच आयसोलेशनची व्यवस्था करून देण्यात आली होती. पण आताच्या परिस्थितीत आम्हाला काम संपल्यावर घरी जावे लागत आहे. आमच्या कुटुंबियांसाठी हे फारच धोक्याचे आहे. त्याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे.