लोकमत न्यूज नेटवर्क
मंचर : कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे वाटप केंद्र सरकार करत आहे. सध्या त्यांच्य कडूनच पुरेसी लस मिळत नाही. त्यामुळे काही प्रमाणात राज्यात लसीचा तुटवडा जाणवत आहे. तसेच १मे पासून १८ ते ४५ वरील सर्वांचे लसीकरण सुरू झाले. यासाठी लागणारी लस राज्य सरकार खरेदी करणार आहे. यासाठी ६.५० कोटी रूपये खर्च करणार आहे. मात्र, कंपन्याकडे उत्पादन तेवढ्या प्रमाणात होत नसल्याने लसीचा पुरेसा पुरवठा होणार नाही. यासाठी स्थानिक प्रशासनाने लसीकरणाचे नियोजन करावे, लसीकरण केंद्रावर गर्दि होणार नाही याची दक्षता घ्यावी असे राज्याचे गृह मंत्री वळसे पाटील यांनी सांगितले.
आंबेगाव तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंचर येथे पदाधिकारी व अधिकारी यांची राज्याचे गृह मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधिक्षक डॉ.अभिजीत देशमुख, प्रांत अधिकारी सारंग कोडोलकर, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्रशेठ शहा, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, अरूण गिरे, आंबेगाव तालुका राष्टवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विष्णुकाका हिंगे आदी उपस्थित होते.
वळसे पाटील म्हणाले, आंबेगाव तालुक्यातील विविध संस्था व व्यक्तिंनी या गंभीर परिस्थितीत पुढे येवून मदतीचा हात पुढे केला आहे. कोरोना मध्ये आॅक्सिजन नियंत्रीत करणाऱ्या मशिन फायदेशीर ठरत आहे. हे घेण्यासाठी दानशुरांनी अजून हातभार लावावा. आदिवासी भागातील रूग्ण संख्या कमी करण्यासाठी समन्वय अधिकारी नेमला जावा.
शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, काही खाजगी रूग्णालये अवास्तव बील आकारत आहेत. रूग्णांकडून बीलांच्या सतत तक्रारी येत असतात. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुकास्तरावर लेखापरिक्षकाची नेमणूक करावी. प्रत्येक खाजगी दवाखान्यात दिल्या जाणाऱ्या बीलांची तपासणी व्हावी. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीमध्ये कोविड केअर सेंटर सुरू केले जावे, लग्न समारंभ, दशक्रिया, साखरपुडा या कार्यक्रमात होणाऱ्या गर्दिवर नियंत्रण आले पाहिजे तसेच लसीचा तुटवडा कमी होवून लसीकरण झाले पाहिजे.
चौकट
बीला संदर्भात कोणतीही तक्रार असेल तर नियंत्रण कक्षाशी संपर्क साधा. प्रत्येक तालुक्याला लेखाधिकारी नेमला असून तात्काळ बीला मध्ये दुरूस्तीकरून दिली जाईल. तसेच जादा बील आकारणाऱ्या रूग्णालयांवर कारवाई केली जाईल. तसेच मंचर हे जिल्हयात जास्त रूग्ण संख्या आढळून येणारे चौथ्या क्रमांचे शहर आहे. येथील संसर्ग कमी करण्यासाठी प्रशासन कठोर पावले उचलत आहे.
- प्रसाद मुख्य कार्यकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी
चौकट
दिलीप वळसे पाटील यांच्या अवाहनाला प्रतिसाद देत , मंचर उपजिल्हा रूग्णालयासाठी आंबेगाव तालुक्यातील विविध दानशुरांनी १.२३ कोटी रूपये १५ व्हेंटिलेटर घेण्यासाठी दिले आहेत. तसेच जानकीदेवी बजाज फौंडेशन हवेतून गोळा करणाऱ्या आॅक्सिजनचे मशिन बसवून देत आहे. तसेच आॅक्सिजन नियंत्रीत करणा-ऱ्या मशिन व इतर सामुग्री प्रशासनावर अवलंबून न रहाता घेतल्या जात आहेत. कोरोना बाबत आंबेगाव तालुक्यात जास्त जास्त सोईसुविधा निर्माण करण्याचे काम सुरू असल्याचे शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्रशेठ शहा यांनी सांगितले.
फोटो : आंबेगाव तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंचर येथे आयोजीत बैठकीत उपस्थित राज्याचे गृह मंत्री दिलीप वळसे पाटील, शिवाजीराव आढळराव पाटील व इतर