पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमिताने जिल्हा प्रशासनातर्फे प्रशासकीय कामांच्या तयारीला सुरूवात झाली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे पालखी सोहळ्याच्या समन्वयाची जबाबदारी विशेष भूमी संपादन अधिकारी यु. डी. भोसले यांच्याकडे देण्यात आली आहे. सर्व पालख्यांशी समन्वय ठेवून आषाढी वारी सोहळा व्यवस्थित व शांततेत पार पाडावा, अशा सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान आळंदीतून तर संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान देहू येथून येत्या ६ जुलै रोजी पंढरपूरकडे होणार आहे. तसेच संत सोपानकाका महाराज पालखी सासवडहून प्रस्थान करणार आहे. या पालख्या पुणे व सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करून पंढरपूर येथे २२ जुलै रोजी पोहचणार आहेत. या पालख्यांसाठी व वारक-यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भोसले यांची नियुक्ती केली आहे. तीन प्रमुख पालखी सोहळ्याचे व इतर पालख्यांचे सहभागी प्रमुख यांच्या संपर्कात राहून त्यांच्याकडून वेळोवेळी उपस्थित करण्यात आलेल्या मुद्दयांवर प्रशासनाशी चर्चा करून आवश्यक ती कार्यवाही करावी. पालखी सोहळ्याची कार्यक्रम पत्रिका प्राप्त करून मुक्कामाच्या ठिकाणांची नोंद घ्यावी. तसेच पालख्या मार्गक्रमण करताना आवश्यक सोई-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. त्यासाठी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्या संपर्कात रहावे. त्याचप्रमाणे आरोग्य, वाहतूक, स्वच्छता व पाणी ,गॅस, रॉकेल पुरवठा अधिकारी यांच्याशी समन्वय साधण्याच्या सुचना भोसले यांच्यासह सर्व संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
प्रशासनाकडून पालखी सोहळ्याच्या तयारीला सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 6:01 PM
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान आळंदीतून तर संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान देहू येथून येत्या ६ जुलै रोजी पंढरपूरकडे होणार आहे.
ठळक मुद्देआरोग्य, वाहतूक, स्वच्छता व पाणी पुरवठा अधिकारी यांच्याशी समन्वय साधण्याच्या सुचना