उरुळी कांचन: सध्या जगभर कोरोना महामारीच्या संकटात मानवजात सापडली असताना हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथे कोरोना केअर सेंटर चालू करण्याबाबत परवानगी मागितली होती. उरुळी कांचन ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन केअर सेंटर सुरू करण्यासाठी वरिष्ठांकडे मागितलेल्या परवानगीच्या प्रस्तावाला नाकारत त्यापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शेजारच्या गावातील मागणीला मान्यता दिली आहे. उरुळीच्या जनतेला कोरोना संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना खो घालण्याचा प्रकार घडला आहे. मात्र हा प्रकार राजकारणातून घडला की प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे घडला याचे उत्तर मात्र अद्याप निरुत्तरीत आहे.
उरुळी कांचन ग्रामपंचायतीने १२ एप्रिलला जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे उरुळी कांचन येथे पन्नास बेडचे कोव्हीड सेंटर चालू करणे बाबतच्या परवानगीसाठीचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाच्या प्रति उपविभागीय अधिकारी हवेली, तहसीलदार हवेली, गटविकास अधिकारी पंचायत समिती हवेली व तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती हवेली यांना देण्यात आल्या होत्या. मात्र या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. अथवा नामंजूर केले. अशा प्रकारचे कोणतेही लेखी पत्र ग्रामपंचायतीला अद्याप प्राप्त झालेले नाही.
याबाबत भाजपचे युवा नेते अजिंक्य कांचन यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, गटविकास अधिकारी हे याबाबत प्रस्ताव मंजुरीसाठी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठवीत असतात. हे प्रस्ताव पाठवण्यासाठी एक कमिटी असते. यामध्ये तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांचा समावेश असतो. त्यांनी शिफारस करून पाठवलेल्या प्रस्तावांना उपविभागीय अधिकारी मंजुरी देऊन आदेश पारित करीत असतात. या कमिटीत जर तालुका आरोग्य अधिकारी यांचा समावेश असेल तर ते उरुळी कांचन ग्रामपंचायतीचा प्रस्ताव आला का नाही हे ठामपणाने का सांगू शकले नाही अशी शंका उपस्थित होत आहे.